आपल्या मित्र पक्षाची वाद न करता आपला शिवसेना पक्ष शांततेत आणि संयमाने वाढवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे : उद्योग मंत्री तथा शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख उदय सामंत
कुडाळ प्रतिनिधी
आपल्या मित्र पक्षाची वाद न करता आपला शिवसेना पक्ष शांततेत आणि संयमाने वाढवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन उद्योग मंत्री तथा शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख उदय सामंत यांनी करून यापुढे नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या उजव्या डाव्या बाजूला असणाऱ्यांना पदे न देता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्षाची पदे देण्यावर आमचा भर असणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालय येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा झाला या मेळाव्याला उद्योग मंत्री तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख उदय सामंत, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, लोकसभा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, बबन शिंदे, रुपेश पावसकर, राजा गावडे, विश्वास गावकर, सचिन वालावलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की आपल्यातील मतभेद आणि मनभेद विसरून मान सन्मान विसरून संघटनेसाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे कारण आपले नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 20 20 तास काम करत आहेत आणि संघटना वाढीसाठी प्रयत्न करत आहेत आपण संघटना वाढवताना मित्र पक्षाला न दुखवता आपला पक्ष संयमाने आणि शांततेने वाद न करता वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. काही पदाधिकारी आपली वहिवाट असल्यासारखी पदे घेऊन बसले आहेत यापुढे असं चालणार नाही माझा डावा माझा उजवा त्यांना पदे द्या हे चालणार नाही तर जो संघटनेसाठी काम करतो त्याला पदे दिली जाणार आहेत तसेच शासनाच्या विविध कमिट्यांमध्ये कुणाला घ्यायचे हे सुद्धा आम्ही ठरवताना संघटनात्मक विचार करणार आहोत असे सांगून या पुढील काळात युवा पिढीला संधी देण्यात येणार आहे असे सांगितले आपल्या भागामध्ये विकास व्हावा म्हणून जो आवश्यक निधी आहे तो निधी आम्ही देणार आहोत आणि महायुतीच्या समन्वय समितीमध्ये तसा फॉर्मुला ठरलेला आहे त्यामुळे कोणीही चिंता करू नये संघटना वाढीसाठी मेहनत घेतली पाहिजे असे आवाहन करून आमदार निलेश राणे यांनी संघटनेच्या संदर्भात जे कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारे भाषण केले त्यांचे हे विचार प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये गेले पाहिजेत म्हणून आम्ही नेते एकनाथ शिंदे यांना पुढील काळातील सभांमध्ये त्यांचे भाषण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी दिले पाहिजे असे त्यांना सांगणार आहोत तसेच आता पक्षाने असे ठरवले आहे की पदाधिकाऱ्यापासून आमदारांपर्यंत प्रत्येकाने आपल्या भागामध्ये महिन्यातील जास्तीत जास्त दिवस दिले पाहिजे आणि काम केले पाहिजे असे सांगून पुढील निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत ज्या कार्यकर्त्यांमुळे आम्ही आमदार मंत्री होतो त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये सहभाग दर्शवून मोठ्या प्रमाणावर आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे पुढील काळात भगवामय सिंधुदुर्ग जिल्हा करण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, आपल्या महायुतीने लोकहिताच्या अनेक योजना आणल्या आहेत आणि या योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत याची प्रसिद्धी लोकांपर्यंत करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगून शिवसेना ही मराठी माणसाच्या जीवावर उभी झाली आहे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या सूत्रावर शिवसेना उभी केली आहे हिंदुत्व हा या पक्षाचा मुलगा आहे या मूळ प्रवाहाच्या बाजूने जे लोक येत आहेत हे सच्चे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते आहेत त्यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाचे नेते काय गोपीनाथ मुंडे व महाजन यांनी भाजप शिवसेना युती घडवून आणली होती मात्र या विचारांना बदनाम करून काहीजणांनी आपल्या स्वार्थासाठी युती तोडली ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे ती काँग्रेसच्या सोनिया गांधींची नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, आपल्या संघटनेचा पाया मजबूत झाला पाहिजे यासाठी प्रत्येकाने संघटना वाढीसाठी काम करणे गरजेचे आहे संघटना वाढवताना आपला कोणी शत्रू नाही असे मानून आपली स्पर्धा आपल्या सोबत करून संघटना वाढवली पाहिजे आपल्या मित्र पक्षांची मनमिळाऊपणे राहिले पाहिजे कुणाला कमी लेखू नये. असे सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संघटना वाढवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत पण या भागांमध्ये आवश्यक असणाऱ्या निधीचा पाऊस उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पाडावा अशी आमची इच्छा असून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वेळ द्यावा आणि संघटना मजबूत करण्यासाठी आम्हाला पाठबळ द्यावे यापुढे स्थानिक स्वराज्य निवडणुका येणार आहेत या निवडणुकीमध्ये आपल्याला भगवा फडकवायचा आहे त्यासाठी जी काही मदत करायची आहे ती आम्ही करणार आहोत फक्त कार्यकर्त्यांनी आपल्यातच वाद न करता संघटना कशी वाढेल याकडे लक्ष दिला पाहिजे संघटनात्मक जे काही गोष्टी आहेत त्या वरिष्ठ स्तरावरून ठरतील पण आपले काम केले पाहिजे त्यामध्ये सातत्य ठेवले पाहिजे असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
यावेळी सावंतवाडी कुडाळ वेंगुर्ला या तालुक्यामधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या सभेचे सूत्रसंचालन रत्नाकर जोशी यांनी केले
