*सिंधुदुर्गनगरी, 21एप्रिल*
जिल्हा मराठी पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या सिंधुदुर्गनगरी मुख्यालय पत्रकार संघाच्या पुढील दोन वर्षासाठीच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, ही निवड बिनविरोध झाली आहे. या निवडीत अध्यक्षपदी लवू म्हाडेश्वर, उपाध्यक्ष पदी तेजस्वी काळसेकर, सचिव दत्तप्रसाद वालावलकर, सहसचिव सतीश हरमलकर आणि खजिनदार पदी गिरीश परय यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक बंटी केनवडेकर आणि अमित खोत यांनी या निवडी जाहीर केल्या.
सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन सभागृहात झालेल्या या निवड कार्यक्रमात संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.
याव्यतिरीक्त गणेश जेठे, संजय वालावलकर, संदीप गावडे, बाळ खडपकर, देवयानी वरसकर, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, मनोज बारंग, विनोद परब यांची सदस्य म्हणून निवड घोषित करण्यात आली. मावळते अध्यक्ष संदीप गावडे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामकाजाबाबत यावेळी मुख्यालय पत्रकार समितीने गौरवोद्गार काढत समाधान व्यक्त केले, तर हे सांघीक कामाचे यश असल्याचे सांगत संदीप गावडे यांनी सर्वांचे आभार मानले व नूतन कार्यकारिणीला पुढील चांगल्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
नूतन अध्यक्ष लवू म्हाडेश्वर यांनी नव्याने संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले, तसेच सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल असे स्पष्ट केले. परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव बाळ खडपकर, देवयानी वरसकर यांनी मनोगत व्यक्त केले, तर दत्ताप्रसाद वालावलकर यांनी आभार मानले.