*सिंधुदुर्गनगरी,22 मे*
-विभागीय वन कांदळवन विभागाच्या वतीने(दक्षिण कोकण)’भारताच्या किनारी भागातील समुदायाची हवामान लवचिकता वाढविणे आणि या समुदायाला सक्षम करणे’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आज येथे जि. प.च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होतीसिंधुदुर्ग जिल्ह्यात या प्रकल्पात काम करणारे भागीदारक, स्वयंसेवी संस्था, शासनाचे कृषी, मत्स्य, वनविभाग,यु.एन.डी.पी. चे अधिकारी व कर्मचारी, कांदळवन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेला कांदळवन विभाग, दक्षिण कोकणच्या विभागीय वनाधिकारी श्रीमती कांचन पवार, मत्स्य प्रकल्प उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेचे प्रमुख डॉ. नितीन सावंत आणि सहाय्यक संशोधन अधिकारी डॉ. कल्पेश शिंदे, सिंधुदुर्ग,रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील वनाधिकारी, देवगड मालवण आणि वेंगुर्ले तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, यु.एन.डी.पी. चे सिंधुदुर्ग प्रकल्प समन्वयक रोहित सावंत, केदार पालव, रिलायन्स फाऊंडेशनचे अधिकारी आणि जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सन जून २०२७ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या सुमारे ३५० कोटी रुपयांच्या योजनेच्या अनुषंगाने परीसंस्थेतील शेतकरी, मच्छीमारांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने कोणकोणत्या योजना आवश्यक आहेत तसेच ज्या मंजूर योजना आहेत त्यात नेमके कोणते बदल करणे आवश्यक आहे आणि नवीन कोणत्या योजना सामाविष्ट करणे आवश्यक आहे या बाबत सविस्तर चर्चा करून पुढील रूपरेषा ठरविण्यात आली.
यावेळी विभागीय वनाधिकारी श्रीमती कांचन पवार आणि मत्स्य शास्त्रज्ञ डॉ. नितीन सावंत यांनी मार्गदर्शन केले. सुरुवातीला यु.एन.डी. पी चे विक्रम यादव आणि रोहित सावंत यांनी ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’ द्वारे प्रकल्पाबाबत माहिती दिली. या कार्यशाळेचे प्रास्ताविक रोहित सावंत यांनी केले तर आभार केदार पालव यांनी मानले.
