फोंडयाहून कोल्हापूरच्या दिशेने दोन वाहनांमधून बेकायदा होणारी गुरांची वाहतूक पोलिसांनी पाठलाग करून रोखली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास फोंडाघाट चेकपोस्टपासून काही अंतरावर करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फोंडयाहून कोल्हापूरच्या दिशेने छोटा टेम्पो (एमएच ०७ वाय १०९३) व बलेरो पिकअप (एमएच ०७ एजे ३३३८) या वाहनांमधून चौघेजण विनापरवाना वाहतूक करीत होते. फोंडाघाट चेकपोस्टही वाहने थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, चालकांनी भरधाव वेगाने वाहने पुढे नेली.
पोलिसांनी वाहनांची पाठलाग करून वाहने रोखली. त्यानंतर वाहनांची तपासणी केली असता वाहनांमध्ये दाटीवाटी कोंबलेली गुरे आढळून आली. गुरे वाहतुकीचा परवानाही चालकांकडे नव्हता. याप्रकरणी पोलिसांनी गणेश सुनील कदम, करण प्रकाश गोसावी (दोघे रा. राधानगरी, कोल्हापूर) अभिनव दिलीप राणे, अक्षय दिलीप राणे (दोघे रा. सातरल, ता. कणकवली) यांना पोलिसांनी ताब्यात घेत गुरांसहित वाहने जप्त केली.
याबाबत पोलीस कॉस्टेबल उद्देश बाबल्या कदम यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्राण्यांच्या छळप्रतिबंधक अधिनियम, पशू संरक्षण अधिनियम, मोटार वाहतूक अधिनियम यानुसार गणेश कदम, करण गोसावी, अभिनव राणे,अक्षय राणे यांच्याविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार उत्तम वंजारे करीत आहे. जप्त केलेली गुरे खांबाळे येथील गोशाळेत पाठवली आहेत.
