कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील कर्ली नदीची इशारा पातळी ९.९१० मीटर इतकी असून सदर नदीची धोका पातळी १०.९१० मीटर इतकी आहे. सद्यस्थितीत सदर नदीची पाणी पातळो १०.०० मीटर इतकी झालेली आहे. कर्ली नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दि.०३ जुलै रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे.
कर्ली नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात येणाऱ्या कुडाळ, पावशी, बाव, सरंबळ, चेंदवण या गावातील नागरिकांना दक्षता घेण्याबाबत आवश्यक सूचना निर्गमित करण्यात आले आहेत. यामध्ये असे म्हटले आहे की,
(१) कर्ली नदीच्या पूरबाधित क्षेत्रात येणा-या कुडाळ, पावशी, बाव, सरंबळ, चेंदवण या गावातील ग्रामस्थांना सदर बाबीची माहिती देण्याबाबत ग्रामस्तरावरील तसेच कुडाळ नगरपालिका स्तरावरील यंत्रणाना आदेश देण्यात यावेत.
(२) नागरिकांनी पुराच्या पाण्यातून ये- जा करू नये.
(३) नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जाणा-या महिला, नदीपात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी याबाबत आवश्यक ती सतर्कता बाळगावी.
(४) कुडाळ, पावशी, बाव, सरंबळ, चेंदवण या ग्रामपंचायतीनी सखल भागात राहणा-या तसेच कच्च्या घरात राहणा-या व्यक्तींबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी, पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास आवश्यकतेनुसार नागरिकांना स्थलांतरित करण्यात यावे.
(५) नदीच्या पाणी पातळीत वाढ होवून पुलांवर पाणी आल्यास अशा पुलांवरून वाहतूक होणार नाही याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, तसेच अशा पुलाच्या ठिकाणी पोलीस तैनात ठेवावेत.
(६) तालुक्यातील शोध व बचाव गटातील पोहणारे सदस्य यांच्या संपर्कात रहावे व त्यांना याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
(७) तालुक्यातील शोध व बचाव साहित्य सुस्थितीत ठेवण्यात यावे, विशेषतः पूरस्थिती निर्माण होवून त्याकरिता होड्यांची आवश्यकता लागल्यास होड्या त्वरित उपलब्ध होतील या अनुषंगाने आवश्यक ते नियोजन तालुकास्तरावरून करण्यात यावे.
(८) पुराच्या पाण्याने झाडे उन्मळून पडल्यास ती बाजूला घेण्यासाठी आवश्यक कटर उपलब्ध करून ठेवावेत. एखादी आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास त्या बाबत जिल्हा नियंत्रण कक्षास त्वरित माहिती द्यावी अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.


