कुडाळ | प्रतिनिधी
मोबाईल कॅन्सर निदान व्हॅन शुक्रवार दि. १ ऑगस्ट 2025 रोजी आयुष्यमान आरोग्य मंदीर (प्राथमिक आरोग्य केंद्र), पणदूर येथे दाखल होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी 2 या वेळेत ही व्हॅन उपलब्ध असणार आहे. या व्हॅन मध्ये स्त्रीरोग तज्ञ, दंत शल्यचिकित्सक उपलब्ध होणार असून, यावेळी मोफत कर्करोग तपासणी व जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग निदान करण्यासाठी तपासणी करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली असून, बऱ्याच वेळी उशिरा निदान झाल्यामुळे कर्करोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी व कर्करोगाचे निदान ग्रामीण भागात लवकर होऊन त्वरीत उपचार मिळावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राज्यामध्ये कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये कॅन्सर तपासणीची सुविधा असलेली सुसज्ज मोबाईल कॅन्सर निदान व्हॅन सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली असून १ ऑगस्ट हि व्हॅन प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर येथे, सकाळी ९ ते 2 या वेळेत उपलब्ध असणार आहे. या कॅन्सर व्हॅन कॅम्प वेळी विविध तपासणी करण्यात येणार आहेत. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग निदान साठी pap smear व VIA तपासणी, मुखाचा कर्करोग व स्तनाचा कर्करोग निदान करण्यासाठी बायोप्सी, मोफत रक्त तपासणी, रक्तदाब, ब्लडशुगर तपासणी, मोफत ई सी जी तपासणी केली जाणार आहे. तपासणी साठी येताना नागरिकांनी आधार कार्ड, आभा कार्ड (काढलेले असल्यास), आधार लिंक असलेला मोबाईल घेऊन यावे आहे. पणदूर पंचक्रोशीसह परिसरातील नागरिक तसेच लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणदूर प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.कविता पराडकर यांनी केले आहे.


