कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ-पाट मार्गावर करमळगाळू येथे मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास इर्टिगा कारचा भीषण अपघात होऊन यामध्ये १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर यातील कारचालक किरकोळ जखमी झाला.
प्राप्त माहितीनुसार, कुडाळवरून पाट गावच्या दिशेने सदर इर्टिगा कार जात होती. या कारमध्ये दोघे जण प्रवास करीत होते. दरम्यान, करमळगाळू येथील तीव्र वळणावर कार येताच चालकाचा त्यावरील ताबा सुटल्याने कार गटारात जाऊन धडकली. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला.
या प्रकरणी कोचरा येथील दत्ताराम राणे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्री वेंगुर्ले तालुक्यातील परुळे-कुशेवाडा येथील चंद्रकांत सुरेंद्र परूळेकर (वय ३२) हा एमएच ०७ एजी ४९९५ या क्रमांकाची इर्टीगा गाडी घेऊन पाटच्या दिशेने जात होता. यावेळी गाडीत त्याच्यासोबत रोहन उर्फ अक्षय आत्माराम सावंत (वय १८) हा होता. गाडी करमळगाळू एसटी स्टॉपनजीक आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण न राहिल्याने कार गटारात जाऊन धडकली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारमधील रोहन उर्फ अक्षय सावंत हा गंभीर जखमी होऊन जागेवरच मृत झाला. या अपघात प्रकरणी स्वतःला किरकोळ दुखापत आणि रोहन याच्या मृत्यूस कारणीभूत धरून निवती पोलीस ठाण्यात चालक चंद्रकांत परूळेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहा. पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेट्ये अधिक तपास करीत आहेत.


