Friday, December 5, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडी*ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत !* 

*ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत !* 

*”एसटीची तुट होत नसून शासनाच्या धोरणामुळे एसटी तोट्यात जात आहे”*

 

   शासनाच्या अनेक सवलतीच्या निर्णयाची परिपूर्ती आणि निश्चित धोरण न आखल्याने एसटी आज तोट्यात आहे. आज राज्य शासनाकडून एसटी महामंडळास ६००० कोटी रुपये येणे आहे. त्यामुळे एसटी कर्मचा-यांची वेतनवाढ, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता इत्यादी देणे अनेक वर्षे प्रलंबित आहेत. ती जर वेळेत दिली नाही तर महाराष्ट्र एसटी कामगार सेना *” माझी एसटी. माझा महाराष्ट्र “* आंदोलन उभ्या महाराष्ट्रात करुन चक्काजाम करेल अशी घोषणा आज खासदार श्री अरविंद सावंत यांनी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या भरगच्च राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत केली. 

     आजच्या सत्ताधा-यांनी, खास करुन भाजपाने, राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरण करावे अशी मागणी करुन उभ्या महाराष्ट्राला वेठीस धरले होते. आपण कर्मचा-यांनी भावनिक होवुन या आंदोलनात सहभाग घेतला होता. तत्कालीन आमदार श्री गोपीचंद पडळकर आणि श्री सदाभाऊ खोत हे आंदोलनाच्या अनेक ठिकाणी जावुन टाळ मृदुंग घेऊन नाचत होते. आपणही ह्या त्यांच्या वरच्या रंगाला भुलून जात होतात. माननीय श्री उध्दव ठाकरे याचे सरकार जावुन साडेतीन वर्षे झाली. त्या साडेतीन वर्षामध्ये विलीनीकरण या शब्दातील *”वि”* या अक्षराचा ना विधानसभेच्या सभागृहात ना सभागृहाबाहेर उच्चार केला. श्री सदावर्ते सारखा खुळचट मानुस डॉ. बाबासाहेबांचे नाव घेवून आपल्याला न्यायाच्या आणाभाका देत होता. आज ही सारी मंडळी सत्तेत आहेत. 

  या सगळ्या अनुभवातून जात असतांना देखील आपण एसटी बँकेच्या निवडणुकीत श्री सदावर्ते यांच्या ताब्यात बँक दिली. आता त्या बँकेचे वाटोळे होतांना आपण पहात आहात. उलट माननीय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकार मध्ये माननीय श्री दिवाकर रावते हे मंत्री असतांना ऐतिहासिक वेतनवाढ देण्यात आली, महिलांना चालक वाहक पदावर घेण्यात आले, कर्मचा-यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य करण्याचे धोरण राबविण्यात आले, माननीय अॅड. श्री अनिल परब यांनी तत्कालीन अर्थमंत्र्यांकडुन १ हजार कोटींचा निधी आणुन कर्मचा-यांना दिलासा दिला होता. शासनाच्या धोरणामुळे एसटी तोट्यात जात आहे हे लक्षात घ्या ! निदान आतातरी शहाणे व्हा ! असे श्री अरविंद सावंत याप्रसंगी म्हणाले आणि म्हणून येत्या दिवाळी पुर्वी एसटी कर्मचा-यांची थकीत देणी दिली नाही तर एसटी कर्मचारी जंग छेडेल कारण एसटी ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी आहे ! ती महाराष्ट्रातील सर्व सामान्यांची आहे. म्हणून तमाम एसटी कर्मचारी *”माझी एसटी ! माझा महाराष्ट्र”* हे आंदोलन करेल. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकनिष्ठ रहा, जगेन तर भगव्याबरोबर आणि मरेन तर भगव्यासाठी ही शपथ घ्या. हे लक्षात घेऊन निवडणुकीत मागच्या चुका पुन्हा करु नका. एसटी कर्मचा-यांनी भगवा झेंडा घेऊन पुढे चला असे आवाहन खासदार श्री अरविंद सावंत यांनी या प्रसंगी केले. 

    या प्रसंगी खासदार श्री अरविंद सावंत यांना “संसद रत्न” पुरस्कार मिळाल्या बद्दल महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष श्री प्रदिप धुरंधर, सरचिटणीस श्री हिरेन रेडकर यांनी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या वतीने अभिनंदन केले. 

     महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या स्थापनेपासून (१९८९) एकनिष्ठ राहिलेले आणि सेवानिवृत्त झालेले सर्वश्री अॅड. लक्ष्मण विशे, राजाभाऊ करंगुटकर, हेमचंद्र गुप्ते, प्रसाद मोरे, वासुदेव जाधव, राजन पाटील, सुधाकर घायवटे, बाळासाहेब राणे, नारायण उतेकर, नारायण निलवे यांच्या निष्ठापूर्वक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सत्कार करण्यात आला. 

    महाराष्ट्र कामगार सेनेच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत चांदा ते बांदा पुरुष व महिला पदाधिकारी प्रचंड संख्येने उपस्थित होते. भरगच्च झालेल्या या बैठकीमुळे तमाम कर्मचा-यांना स्फुरण चढले होते व आंदोलन करण्याच्या मानसिकतेेने आज जिल्हा जिल्हयांमध्ये परतले ते भगवा फडविण्यासाठी..

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!