कुडाळ :
मुंबई गोवा महामार्गालगतच असलेल्या बँक ऑफ इंडियाचे झाराफ येथील एटीएम अज्ञात चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएमची संबंधित यंत्रणेने सतर्क होत त्वरित कुडाळ पोलिसांना माहिती दिल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. पोलीस येत असल्याचे समजताच चोरट्यानी चोरीसाठी वापरलेले गॅस कटर व गॅस सिलेंडर व इतर साहित्य त्याच ठिकाणी टाकून पोबारा केला. यामध्ये सुमारे दोन चोरटे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस व संबंधित यंत्रणेच्या सतर्कतेमुळे बँक ऑफ इंडियाचे सुमारे नऊ लाख 50 हजार रुपये रक्कम वाचली. याप्रकरणी कुडाळ पोलिसात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मध्यरात्री 2.31 वा च्या सुमारास घडली.
एटीएम फोडीचा प्रयत्न फसल्याची कुडाळ तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. कुडाळ पोलीस स्टेशन येथे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एटीएम च्या नवी मुंबई येथील यंत्रणेकडून एक फोन आला. यामध्ये झाराप येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांकडून केला जात असल्याची माहिती मिळाली. यानुसार रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी कोणताही विलंब न करता झाराप गाठले. मात्र पोलीस येत असल्याची कुणकुण संबंधित चोरट्यांना आधीच लागली असावी. त्यामुळे चोरटे सतर्क होत घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र त्यांनी या चोरीसाठी वापरलेले साहित्य त्याच ठिकाणी टाकले. यामध्ये एक सिलेंडर गॅस कटर, सिलेंडर पाना, एलपीजी गॅस टाकी आदी साहित्याचा समावेश आहे. चोरट्यांनी आपल्या हालचाली सीसीटीव्ही मध्ये कैद होऊ नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा वर चिकटपट्टी लावल्याचे दिसते. पोलीस येण्याआधीच चोरटे पळाले यावरून चोरट्यांचा एक माणूस तेहाळणी करत काही अंतरावर उभा असल्याचे लक्षात येते. बँक ऑफ इंडिया चे झाराप येथील एटीएम निर्मनुष्य भागात असून याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएमची संबंधित यंत्रणा व पोलिसांची सतर्कता यामुळे त्यांचा हा प्रयत्न पूर्णतः फसला. बँक प्रशासनाकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या एटीएम मध्ये सुमारे 9 लाख 50 हजार रुपये रक्कम असल्याचे समजते. पोलिसांनी घटनास्थळी मिळालेले साहित्य जप्त केले आहे. क्ष याबाबत बँक ऑफ इंडियाचे अधिकारी गुरु प्रीत सिंह यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी आपल्या हातामध्ये हॅन्ड ग्लोज तसेच चेहरा पूर्णता कापडाने झाकलेला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेल्या हालचालीमध्ये दिसत आहे. चोरट्यांनी हायवे लगत असूनही त्या ठिकाणावरून न येता लगतच्या झाडी झुडपातून घटनास्थळी प्रवेश केला. लगतच्या एका छोट्या नाल्यातून सिलेंडर गॅस ओढत आणल्याच्या खुणा त्या परिसरात दिसत आहेत. चोरट्यांनी एटीएम फोडीचा सर्व प्रकारे व सर्व तयारीनिशी प्रयत्न करूनही संबंधित यंत्रणा व पोलीस यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना रिकामी हात जावे लागले. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली अडकूर करत आहेत. कुडाळ शहरातील असेच एक एटीएम गेल्या काही महिन्यापूर्वी चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला होता. एटीएमची संबंधित यंत्रणा व पोलीस प्रशासन यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांना काही आरोपी व सुमारे दहा लाखाच्या आसपास रक्कम हस्तगत करण्यात यश मिळाले होते. याच घटनेची पुनरावृत्ती झाराप मध्ये झाली. मात्र सुदैवाने एटीएम मधील रक्कम 24 गेली नसली तरी चोरटे मात्र पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.


