जि. प. चे मुख्य का. अधिकारी रवींद्र खेबूडकर यांचा नाविन्य पूर्ण उपक्रम…!
सिंधुदुर्गनगरी(प्रतिनिधी)–
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘प्लास्टिक व ई- वेस्ट’ संकलन स्पर्धेच्या माध्यमातून सुमारे ६,००० किलो प्लास्टिक गोळा करण्यात आले आहे.
यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, रॅपर्स आदीचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या संकल्पनेतून दिनांक १५ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेत जिल्ह्यातील माध्यमिक व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व पूर्ण प्राथमिक अशा एकूण ६०२ शाळांनी भाग घेतला होता.
पर्यावरण संवर्धन, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये ‘प्लास्टिक बंदी ‘बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने खेबुडकर यांच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे जिल्ह्यातील पालक वर्ग आणि ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कविता शिंपी,शिक्षणाधिकारी(प्राथमिक), गणपती कमळकर अन्य खाते प्रमुख,तालुक्यातील सर्व गटविकास अधिकारी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सहाय्य केलं.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन खेबुडकर यांनी केले होते या आवाहनाला जिल्ह्यातील शाळा आणि विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे ६,००० किलो प्लास्टिक या निमित्ताने गोळा करण्यात आले.
या स्पर्धेत तालुक्यात सर्वात जास्त प्लास्टिक बाटल्या गोळा करणाऱ्या उत्कृष्ट शाळांचा व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
गोळा झालेले सर्व प्लास्टिक सांगली मिरज येथील शिवप्रतिज्ञा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडे पुढील प्रक्रियेसाठी सुपूर्द करण्यात येणार आहे.
या नाविन्यपूर्ण स्पर्धेत जिल्ह्यातील ६०२ शाळांनी सहभाग घेतला यात सर्वाधिक मालवण तालुक्यातील १६० शाळांचा सहभाग होता. त्या पाठोपाठ वेंगुर्ले -१३५ आणि देवगड -११७ शाळांचा सहभाग होता. कणकवली, सावंतवाडी, कुडाळ या तालुक्यातील शाळांकडून अल्प प्रतिसाद मिळाला तालुक्यातील सुमारे ५० शाळांनी स्पर्धेत भाग घेतला.
एकट्या मालवण तालुक्यातून ३,०३८ किलो प्लास्टिक गोळ्या करण्यात आले. देवगड -८२८ किलो, वैभववाडी- ६३६ किलो, कणकवली -२६७ किलो, कुडाळ- ६७१ किलो, वेंगुर्ले 116 किलो, सावंतवाडी- ११६ किलो, दोडामार्ग-१८५ किलो प्लास्टिक गोळा करण्यात आले.


