Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळआरोग्य विभागाच्या तत्परतेने तान्हुल्याला हृदय संजीवनी

आरोग्य विभागाच्या तत्परतेने तान्हुल्याला हृदय संजीवनी

कुडाळ | प्रतिनिधी

 

कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील मनोहर जाधव व सौ. मयुरी जाधव यांचा दोन वर्षीय मुलागा ऋत्विक मनोहर जाधव याला जन्मतः हृदयामध्ये छिद्र असल्याचे निदान झाले. श्वासाला अडथळा येऊ लागला. पालकांची धावपळ सुरु झाली. रुग्णालयात धाव घेतली. अशावेळी कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातील डॉ. मुक्ता दुधगावकर, डॉ. श्रेयस परब तसेच परिचारिका सौ. विनया नार्वेकर आणि औषध निर्माता श्री. विवेक आंगणे मदतीला धाऊन आले. तत्परतेने बालकाचा 2D ECO रिपोर्ट डॉ. प्रशांत बोभाटे यांच्या मदतीने समजून घेऊन तातडीची ऑपरेशनची गरज आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी पालकाना धीर देण्याचे काम पहिले केले. तसेच ऑपरेशन साठी ची मानसिकता तयार करण्यासाठी सुद्धा आधार दिला. या कार्यक्रमामार्फत आज पर्यंत झालेले अनेक यशस्वी शस्त्रक्रियांचे दाखले त्यांना देण्यात आले आणि पालकांना आश्वस्त करण्यात आले की एकही रुपया न खर्च करता शासनातर्फे हे ऑपरेशन मोफत होईल. दिलेल्या सल्ल्याप्रमाणे बाळाच्या पालकांनीही मेहनत घेतली. शासकीय योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता ऋत्विक चे मामा श्री नितीन जाधव यांच्यामार्फत त्वरित करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी तातडीने मुलाच्या ऑपरेशन साठी येणाऱ्या खर्चाबाबतच्या मंजुरीचे पत्र दिले. लवकरात लवकर ऑपरेशन व्हावे अशी सर्वांचीच इच्छा होती त्याप्रमाणे संघटित होऊन आरोग्य विभागाने तत्परता दाखवल्याचे दिसून येते जिल्हा पातळीवर कागदपत्रांचे सर्व फॉलोअप जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक श्री राजेश पारधी यांनी त्वरित करून दिले.

कोकिळाबेन हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत बोभाटे यांचे कडून दि. १० जानेवारीला बाळाच्या हृदयावर यशस्वी ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. आता पालक बाळाला घेऊन आपल्या घरी सरंबळ ला आले आहेत. बाळाची प्रकृती उत्तम असल्याने ते आनंदात आहेत. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांचे आणि आरोग्य विभागाचे आभार मानले आहेत. खाजगी रुग्णालयामध्ये ऑपरेशनला जेथे दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो असे ऑपरेशन अत्याधुनिक रुग्णालयामध्ये मोफत करून दिल्याबद्दल राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे त्यांनी मनापासून आभार मानले आहेत.

कुडाळ तालुक्यामधील नवजात बालकापासून ते १८ वर्ष वयापर्यंत बालकास आरोग्याची कोणतीही समस्या उ‌द्भवल्यास ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकाशी संपर्क साधावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालय कुडाळचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय वाळके व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.

कुडाळ तालुक्यातील दोन पथकाने सन २०२४-२५ मध्ये ९५ शस्त्रक्रिया आणि ७ हृदयरोग शस्त्रक्रिया यशस्वी करून अनेक बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामार्फत मदत पोहोचविली आहे. महिला बाल रुग्णालय कुडाळ व ग्रामीण रुग्णालय कडाळ यांच्या प्रयत्नाने या बालकांना उपचार देण्यात मोठे यश प्राप्त होताना दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!