महसूल प्रशासन व एनडीआरएफच्या पथकाने केले रेस्क्यू
कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ शहरांमध्ये पुरात अडकलेल्या रेड्याला एनडीआरएफ पथकाने सुखरूप बाहेर काढले. या रेड्याला चरण्यासाठी शेत जमिनीमध्ये मालकाने बांधून ठेवले होते. रेडा असलेल्या ठिकाणी पुराचे पाणी आल्यामुळे हा रेडा पाण्यात अडकला होता.
कुडाळ शहरातील श्री कर्णेकर यांनी आपल्या मालकीचा रेडा रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रोडवरील ख्रिश्चनवाडी नजीक असलेल्या शेत जमिनीमध्ये चरण्यासाठी बांधला होता दरम्यान कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे या शेत जमिनीमध्ये पुराचे पाणी आले आणि या पुराच्या पाण्यामध्ये रेडा अडकला. त्याला बाहेर काढणे कठीण झाले अखेर स्थानिक नागरिकांनी तहसील कार्यालय येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला याबाबत माहिती दिली असता घटनास्थळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वीरसिंग वसावे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, नायब तहसीलदार प्रतीक आढाव, एनडीआरएफचे पथक प्रमुख प्रमोद राय, माजी नगराध्यक्ष आफरीन करोल, नगरसेवक विलास कुडाळकर, पोलीस पाटील विश्राम कुडाळकर आदी दाखल झाले होते.
या रेड्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी एक टीम पुराच्या पाण्यामध्ये बोटीने गेली या बोटीमध्ये एनडीआरएफचे रविंद्र अहलावत, नायब तहसीलदार प्रतीक आढाव, अवी शिरसाट व एनडीआरएफचे जवान होते या सर्वांनी पुराच्या पाण्यात जाऊन रेडा असलेल्या ठिकाणी गेले आणि बांधलेली दोरी तोडली आणि त्या रेड्याला सुखरूप बाहेर काढले तसेच कुडाळ शहरातील इतर ठिकाणी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा आढावा प्रशासनाने घेतला.
