कुडाळ | प्रतिनिधी
डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळच्या केंद्रीय ग्रंथालयाच्या वतीने आज ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. टी. आवटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. शरयू आसोलकर, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. बी. ए. तुपेरे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होता.
ग्रंथप्रदर्शनामध्ये विविध विषयांवरील संदर्भग्रंथ, नवीन पुस्तके, शब्दकोश, विश्वकोश तसेच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त साहित्य मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि ग्रंथालयातील उपलब्ध साहित्याचा अधिकाधिक उपयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
तसेच महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्य व विचारांवर आधारित ग्रंथांचे विशेष प्रदर्शनही आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध ग्रंथांची माहिती घेतली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. एस. एस. लोखंडे, ग्रंथालय परिचारक श्री. जी. ए. हळदणकर, व श्री. विष्णु आगलावे तसेच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडण्यास निश्चितच मदत होणार आहे.


