कुडाळ येथील तिरंगा रॅलीमध्ये पालकमंत्री नितेश राणेंसह आमदार निलेश राणे झाले सहभागी
कुडाळ | प्रतिनिधी
आपल्यासाठी राष्ट्र प्रथम आहे आणि त्या राष्ट्राचा विकास करताना देशाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी जेवढी सैनिकांची आहे तेवढी जबाबदारी आपली आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथे राष्ट्रप्रेमी नागरिक मंचाच्यावतीने आयोजित केलेल्या तिरंगा रॅली मध्ये केले. यावेळी आमदार निलेश राणे यांनी हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही शेकडो लोकांचे जीव गेल्यावर हे स्वातंत्र्य मिळाले आहे. ते आबादीत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे असे त्यांनी सांगितले.
कुडाळ येथे राष्ट्रप्रेमी नागरिक मंचाच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही तिरंगा रॅली श्री देव भैरव मंदिर ते संत राऊळ महाराज महाविद्यालयापर्यंत काढण्यात आली. यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या रॅलीमध्ये पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा महिला जिल्हाप्रमुख कोरगावकर, राष्ट्रप्रेमी नागरिक मंचाचे विवेक पंडित, संयोजक संदीप गावडे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर, माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, सभापती मिलिंद नाईक, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, रुपेश कानडे, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते तसेच लोकप्रतिनिधी विद्यार्थी राष्ट्रप्रेमी नागरिक मंचाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या तिरंगा रॅलीमध्ये भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्या यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, आपला देश आपल्यासाठी पहिला आहे देशाची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे आपण देशासाठी केलेला संकल्प आणि राष्ट्राच्या हितासाठी दाखवलेला विश्वास हा आपल्याला घरी घेऊन जायचं आहे आणि नेहमी देशासाठी काम केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
देश टिकला तर आपण टिकू:- आमदार निलेश राणे
यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की हा देश टिकला तर आपण टिकणार आहोत देश नसेल तर तुमची आमची किंमत शून्य आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी किती जणांनी बलिदान दिले आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे जे आपण आता स्वातंत्रपणे फिरत आहोत बोलत आहोत यामागे अनेक जणांचा त्याग आहे तो विसरून चालणार नाही मुलांमध्ये देश प्रेमभावना निर्माण होणे गरजेचे आहे ती एका दिवसासाठी नाही तर कायम देशप्रेम मनामध्ये राहिला पाहिजे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज वालावलकर यांनी केले.


