कुडाळ | प्रतिनिधी
कोकणभूमीचे सुपुत्र, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे देशासाठी एक अमूल्य संपत्ती आहेत. देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेले उत्कृष्ट कार्य आणि दिलेले योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. असे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आपल्या कोकणचे आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
‘एक थेंब… एक आशा’ या संकल्पनेतून ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच आरोग्य व रक्त तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ या सेवाभावी उपक्रमाचा शुभारंभ आज अणाव येथे कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी माजी खासदार सुरेश प्रभू, मानव साधन विकास संस्था अध्यक्षा सौ. उमा प्रभू, उपाध्यक्ष दादा साईल, आरोग्य सभापती श्री. प्रितेश राऊळ यांच्यासह डॉक्टर, संस्थेचे पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्याच्या या स्तुत्य आणि सेवाभावी उपक्रमाला शुभेच्छा आमदार निलेश राणे यांनी दिल्या आहेत.


