कुडाळ | प्रतिनिधी
श्री सद्गुरू भक्त सेवा न्याय याचा सामाजिक संस्थेच्या वतीने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मन ही एक अद्भुत शक्ती ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन दीप प्रज्वलित करून सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांनी केले. सद्गुरूंचे स्वागत या संस्थेचे विश्वस्त व योगाप्रमुख मनीष नाईक यांनी केले. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सद्गुरु श्री गावडे काका महाराज म्हणाले आजच्या युगात प्रत्येक ठिकाणी स्पर्धा करावी लागते, विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून थोडे दूर राहून अभ्यासाचा मानसिक ताण तणाव दूर करण्यासाठी या कार्यशाळेत दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनातून आपल्या जीवनात योग्य उपयोग करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास या सामाजिक संस्थेच्या मार्फत हा कार्यक्रम सतत चार वर्षे राबविला जात असून, यंदाचे हे पाचवं वर्ष आहे. आंतरराष्ट्रीय योगशिक्षक आनंद सावंत सर आणि तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन हे विद्यार्थी वर्गाला यशस्वी होण्यासाठी अनमोल ठरत आहे. अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. आई-वडिलांनी आपल्या पाल्यावर लक्ष केंद्रित करून स्वतःच्या पाल्याला कोणती आवड आहे, हे पाहूनच त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजेच तो विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या ठिकाणी सुप्त गुण असतात ते ओळखण गरजेच आहे. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळू शकत.
मन ही एक अद्भुत शक्ती या कार्यशाळेस उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेत आजच्या स्पर्धात्मक शैक्षणिक वातावरणात परीक्षेची भीती,मानसिक ताण तणाव, एकाग्रतेचा अभाव, स्मरणशक्ती कमी होणे, आत्मविश्वास ढासळणे, या सर्व समस्यावर योगशास्त्राच्या शास्त्रशुद्ध व अनुभवावर आधारित उपायाद्वारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगशिक्षक आनंद सावंत सर यांनी मार्गदर्शन केले. एकाग्रता वाढवणारी योग साधने, ताण कमी करणारे प्राणायाम, मन स्थिर करणाऱ्या मुद्रा, त्राटक डोळे व मन एकाग्र करण्याची प्रभावी योग साधना, धारणा- विचारांना एका बिंदूवर स्थिर करण्याचे तंत्र,योगिक दृष्टिकोनातून अभ्यास स्मरणशक्ती व अभ्यासात यशाचे मार्गदर्शन हे सर्व मार्गदर्शन देण्यात आले. यासोबत श्री सद्गुरु गावडे काका महाराज यांनी योगनिद्रा सत्र हे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले. विद्यार्थी वर्गासोबत त्यांचे पालकही या कार्यक्रमात उपस्थित होते त्यांनाही योग्य मार्गदर्शन करण्यात आले. अनेक विद्यार्थी व पालकांनी आपल्या सुंदर अशा प्रतिक्रिया या कार्यक्रमाबाबत दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार अध्यक्ष राकेश केसरकर यांनी मानले यावेळी योगशिक्षक आनंद सावंत सर दिलीप सुतार सर विश्वस्त मनीष नाईक सौ रश्मी डिचोलकर साई पेडणेकर उपस्थित होते.


