Saturday, September 5, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ नगरपंचायतीच्या स्वच्छता निरीक्षकावर १२०० रुपयांची चांदीची अंगठी स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाची कारवाई

कुडाळ नगरपंचायतीच्या स्वच्छता निरीक्षकावर १२०० रुपयांची चांदीची अंगठी स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाची कारवाई

कुडाळ | प्रतिनिधी 

 

कुडाळ नगरपंचायतीमध्ये व्यवसायासाठी ना हरकत दाखला मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे १२०० रुपये किमतीची खड्यासह चांदीची अंगठी मागितल्याप्रकरणी कुडाळ नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक पांडुरंग वासुदेव नाटेकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी सापळा कारवाई केली. या कारवाईत नाटेकर यांनी तक्रारदाराकडून अंगठी स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. मात्र, कारवाईपूर्वी संशय आल्याने त्यांनी अंगठी लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक श्रीम संगिता पाटील यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय तक्रारदार यांनी ६ जुलै २०२६ रोजी कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे ‘पदमगड ज्वेलर्स’ या नावाने व्यवसाय सुरू करण्यासाठी ना हरकत दाखला मिळावा, यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी तक्रारदार दाखला घेण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीमध्ये गेले होते. यावेळी स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांनी तक्रारदाराकडे १२०० रुपये किमतीची नवीन खड्यासह चांदीची अंगठी मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

या तक्रारीची २७ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी नाटेकर यांनी तक्रारदाराकडे सदर अंगठीची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

त्यानंतर शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी कुडाळ नगरपंचायत कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने नाटेकर यांची भेट घेतली असता त्यांनी १२०० रुपये किमतीची खड्यासह चांदीसदृश धातूची अंगठी स्वीकारली. मात्र, नाटेकर यांना सापळा कारवाईचा संशय आल्याने त्यांनी अंगठी कुठेतरी लपवून ठेवली आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपास पथकाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, नाटेकर यांच्या हाताच्या बोटांवर अँथ्रोसिन पावडरचे स्पष्ट चिन्ह आढळून आले. त्यामुळे त्यांनी अंगठी स्वीकारण्याची खात्री झाली त्यानंतर दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) मधील कलम ७ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २३८ अन्वये कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सिंधुदुर्ग युनिटचे पोलीस निरीक्षक दीपक माळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस उपअधीक्षक संगीता पाटील, पोलीस निरीक्षक दीपक माळी, पोलीस हवालदार कदम, पोलीस हवालदार देसाई, पोलीस शिपाई जगताप, चालक पोलीस हवालदार खोत आणि महिला पोलीस शिपाई राऊळ यांचा समावेश होता.

कारवाईवर अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे आणि अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांचे पर्यवेक्षण होते. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्याचे आवाहन

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस उप अधिक्षक श्रीम संगिता पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!