Tuesday, September 29, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळस्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आमदार निलेश राणे यांचे...

स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आमदार निलेश राणे यांचे आवाहन 

१५५ उमेदवारांची उपस्थिती; ९७ उमेदवारांची प्राथमिक तर १९ उमेदवारांची अंतिम निवड

 

कुडाळ | प्रतिनिधी 

बदलत्या रोजगार क्षेत्रात कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित करून युवकांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करून स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आवाहन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे केले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभर ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ अंतर्गत ५०० हून अधिक ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून, त्यापैकी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे आयोजित रोजगार मेळावा उत्साहात संपन्न झाला.

संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आयोजित या रोजगार मेळाव्याची सुरुवात शासनाच्या ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमाने झाली. यावेळी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार मा. निलेशजी राणे, क. म. शि.प्र. मंडळाचे पदाधिकारी श्री.अरविंद शिरसाट, श्री. अनंत वैद्य, श्री. महेंद्र गवस, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, श्री. सिद्धेश जगताप, विशेष कार्य अधिकारी, कौशल्य विकास विभाग, श्रीमती. प्रतिभा चव्हाण, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, श्री. अमीन तडवी, प्रभारीआयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार निलेश राणे यांनी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करताना बदलत्या रोजगार क्षेत्रात कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. युवकांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करून स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावे आयोजित करण्याची गरज असून, यासाठी शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी सुचविले.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी उपस्थित मान्यवर, कंपन्यांचे प्रतिनिधी, उमेदवार आणि आयोजकांचे आभार मानले. महाविद्यालयाच्या माध्यमातून भविष्यातही अशा रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून युवकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

उद्घाटन कार्यक्रमानंतर विविध कंपन्या व आस्थापनांच्या प्रतिनिधींकडून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. या रोजगार मेळाव्यासाठी एकूण ११ कंपन्या व आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील ३६७ रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. मेळाव्यास १५५ उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी ९७ उमेदवारांची प्राथमिक निवड, तर १९ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.

रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी क. म. शि. प्र. मंडळाचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे प्रभारी आयुक्त श्री. अमीन तडवी यांचे सहकार्य लाभले. रोजगार मेळाव्याचे समन्वयक डॉ. साईनाथ लोखंडे, प्लेसमेंट सेलचे सर्व सदस्य तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियोजनबद्ध सहकार्यामुळे रोजगार मेळावा यशस्वीरीत्या संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!