Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ येथे उद्या शनिवार २८ सप्टेंबर पासून रंगणार पालकमंत्री राज्य मानांकन कॅरम...

कुडाळ येथे उद्या शनिवार २८ सप्टेंबर पासून रंगणार पालकमंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

कुडाळ | प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन व भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे पालकमंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धा उद्या शनिवार २८ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेमध्ये पुरुष गटामध्ये १४८ तर महिला गटामध्ये ३२ खेळाडू खेळणार आहेत.

कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे पालकमंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धा दि. २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन उद्या शनिवार २८ सप्टेंबर रोजी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन उपाध्यक्ष यतीन ठाकूर, प्रदीप भाटकर, सिंधुदुर्ग अध्यक्ष ॲड. अवधूत भणगे, उपाध्यक्ष सुनील धुरी, सचिव योगेश फणसळकर आदी उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेसाठी प्रमुख पंच दोन, तांत्रिक अधिकारी एक, स्पर्धाप्रमुख एक, बोर्ड पंच १६ राहणार आहेत, पहिल्या दिवशी दोन फेऱ्या होणार असून सर्व सामने बाद फेरी (नॉक आउट) होणार आहे. या पहिल्या दिवशी दि. २८ सप्टेंबर रोजी विश्वविजेता संदीप दिवे, योगेश परदेशी, माजी विश्व विजेता प्रशांत मोरे, आशिया कप विजेता महम्मद घुफ्रान यांचा समावेश असणार आहे. दुसऱ्या दिवशी दि. २९ सप्टेंबर रोजी पुरुषांसह महिलांची स्पर्धा होणार आहे यामध्ये चार फेऱ्या पुरुषांच्या तर तीन फेऱ्या महिलांच्या होणार आहेत. महिलांमध्ये काजल कुमार, आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा कदम खेळणार आहेत तसेच तिसऱ्या दिवशी दि. ३० सप्टेंबर रोजी उपउपांत्य फेरी, उपांत्य फेरी, अंतिम फेरी तसेच प्ले ऑफ मॅच होणार आहे. या तिन्ही दिवशी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडूंचा समावेश असणार असून त्यांचा कॅरमचा खेळ पाहायला प्रेक्षकांना मिळणार आहे.

प्रदीर्घ कालावधीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात १४८ तर महिला एकेरी गटात ३२ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. पुरुष एकेरी गटात विद्यमान राज्य विजेत्या पुण्याच्या अनिल मुंढेला तर महिला एकेरी गटात विद्यमान राज्य विजेती मुंबईच्या काजल कुमारीला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. योगेश परदेशी, प्रशांत मोरे व संदीप दिवे या तीन विश्वविजेत्या सहित महम्मद घुफ्रान, प्रकाश गायकवाड, पंकज पवार, काजल कुमारी, आकांक्षा कदम सारख्या आंतर राष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील विजेत्या खेळाडूंना जवळून पाहण्याची संधी कुडाळ व सिंधुदुर्गातील कॅरम प्रेमींसाठी आहे. शिवाय स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेलवरून करण्यात येईल. 

स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे. 

पुरुष एकेरी 

१) अनिल मुंढे ( पुणे ), २) योगेश परदेशी ( पुणे ), ३) विकास धारिया ( मुंबई ), ४) सागर वाघमारे ( पुणे ), ५) महम्मद घुफ्रान ( मुंबई ), ६) संदीप दिवे ( मुंबई उपनगर ), ७) झैद अहमद फारुकी ( ठाणे ), ८) प्रशांत मोरे ( मुंबई )

महिला एकेरी 

१) काजल कुमारी ( मुंबई ), २) मधुरा देवळे ( ठाणे ), ३) दिक्षा चव्हाण ( सिंधुदुर्ग ), ४) समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ), ५) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ), ६) पुष्कर्णी भट्टड ( पुणे ), ७) प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ), ८) केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव योगेश फणसळकर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!