आरोपी तर्फे देवगड येथील विधिज्ञ अँड.कौस्तुभ मराठे यांनी केला युक्तिवाद
माहे एप्रिल २०१९ मध्ये महाळुंगे, ता. देवगड येथे १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीवर दुपारचे वेळेस घरात घुसून हातपाय बांधून बलात्कार केल्याप्रकारणी पोक्सो कायदा कलम ४, ५, ६ अंतर्गत सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात चालू असलेल्या खटल्यातून संशयित आरोपी बबन उर्फ चंद्रकांत आत्माराम तांबे रा. देवळेकरवाडी (महाळुंगे) याची प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी बलात्कारासह सर्व आरोपामधून निर्दोष मुक्तता केली आहे. या कामी आरोपीतर्फे बचावपक्षाचे विधिज्ञ म्हणून देवगड येथील अँड कौस्तुभ मराठे यांनी काम पाहिले.
माहे एप्रिल २०१९ मध्ये पिडितेची वार्षिक परिक्षा सुरु होती. तेव्हा दुपारचे वेळेस ती आपल्या घरी असताना संशयित आरोपी बबन उर्फ चंद्रकांत आत्माराम तांबे याने मागील दरवाज्याने घरात घुसून स्वयंपाक घरात पिडीतेवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची फिर्याद पिडीतेच्या आईने विजयदुर्ग पोलीस स्टेशन येथे नोंदवली होती. सदर घटनेनंतर या प्रकरणातील पिडीत मुलीला मानसोपचारांसाठी रत्नागिरी मनोरुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.
विजयदुर्ग पोलीसांनी तात्काळ पोक्सो कायदा कलम ४, ५, ६ सह भा.दं.वि. कलम ३७६ (२) व कलम ३२३ अंतर्गत संशयित आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला होता. पिडीत मुलीचा नातेवाईक असणाऱ्या संशयिताला विजयदुर्ग पोलीसांनी तात्काळ अटकही केली होती सदरचा खटला सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात चालला होता. सरकार पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले होते. तथापि पिडीतेची वैद्यकीय पुराव्यातील विसंगती पिडीतेची जन्मतारीख शाबित न होणे इत्यादी मुद्दयांचे आधारे मा. न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता जाहीर केली आहे.


