कुडाळ | प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (सिंधुदुर्ग) च्या पथकाने मुंबई गोवा महामार्गावर झाराप झीरो पाॅइंट येथे गुरूवारी पहाटेच्या सुमारास कारवाई करीत गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन कार सह सुमारे 10 लाख 92 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या गुन्ह्यात सावंतवाडी आणि ओरोस मधील चार संशयित आरोपींना ताब्यात घेत, याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबी कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गोवा बनावटीच्या अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहीती एलसीबी विभागाला मिळाली होती. त्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार प्रकाश कदम, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, कॉन्स्टेबल महेश्वर समजीसकर यांच्या पथकाने रात्रीच झाराप झिरो पॉईंट येथे सापळा रचला. त्यानंतर ११ सप्टेंबरच्या पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास गोव्याहून कुडाळच्या दिशेने जाणा-या संशयित आय टेन आणि स्विफ्ट कार एलसीबी पथकाने थांबविल्या. एलसीबी च्या पथकाने दोन्ही कार थांबवून पाहणी केली असता दोन्ही कारमध्ये एकूण 2 लाख 92 हजार 800 रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू आढळून आली. त्यानंतर तात्काळ दोन्ही कार सह चार संशयितांना एलसीबी पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कुडाळ पोलीस करत आहेत.


