२५ डिसेंबर पर्यंत वाळू लिलाव व परवाना प्रक्रिया पूर्ण न केल्यास डंपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेऊन येणार..
कुडाळ | प्रतिनिधी
वाळू व डंपर व्यवसायिकांनी आता प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारला असून २५ डिसेंबर पर्यंत वाळवलीला झाला नाही तर डंपर व्यवसायिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर आणून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे या संदर्भात वाळू व डंपर व्यवसायिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनामध्ये डंपर व वाळू व्यवसायिकांनी असे म्हटले आहे की, चालू वर्षातील वाळू परवाना अद्याप झाला नसून, प्रतिवर्षी ऑक्टोबर महिन्यात वाळू लिलाव करून परवाना प्रक्रिया पूर्ण केली जाते. या व्यवसायाशी निगडित गवंडी कामगार, डंपर मालक- चालक, हार्डवेअर स्टोअर, लाकूड मेस्त्री, गॅरेज व्यावसायिक, बांधकाम व्यवसायिक, घरकुल लाभार्थी, शासकीय ठेकेदार, बिल्डर्स व्यावसायिक यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना उपासमारीची वेळ येणार आहे.
यावर्षी आपल्या विभागाकडून दि. ८ ऑक्टोंबर ते १४ ऑक्टोंबर या कालावधीत परवाने अर्ज मागविले गेले. यामध्ये ५८ वाळू परवानाधारकांनी सहभाग घेतला. व सर्व प्रकरणे आपल्या विभागाकडून मंजूर करण्यात आली. त्यामुळे सर्व परवानाधारकांनी कामगार व यंत्रसामुग्रीची जुळवा जुळवा केली. परंतु आज दिनांक १२ डिसेंबर २०२५ पर्यंत पुढील परवाना प्रक्रियेची कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे डंपर व वाळू व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
सदर लिलाव दि. २५ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करावा व वाळू व्यावसायिक डंपर व्यावसायिक यांना दिलासा द्यावा अन्यथा २५ डिसेंबर नंतर संपूर्ण जिल्ह्यातील डंपर वाळू व्यवसायिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपले डंपर उभे करून बेमुदत धरणे आंदोलन करतील. व होणाऱ्या सर्व बाबींना प्रशासन जबाबदार असेल. तरी विनंतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे हे निवेदन निवासी जिल्हाधिकारी सुकटे यांनी स्वीकारले. यावेळी समीर दळवी नित्यानंद शिरसाट मिलिंद परब राजेश प्रसादी अभिषेक गावडे धीरज परब राजन वाळके यांच्यासह अन्य डंपर व वाळू व्यवसायिकांनी हे निवेदन दिले आहे.


