सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत जिल्ह्यात एकूण ६१.९८ टक्के मतदान झाले असून, दुपारी ३.३० वाजेपर्यंत ही टक्केवारी ५०.१० इतकी होती. शेवटच्या दोन तासांत मतदारांचा उत्साह वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जिल्ह्यात एकूण ५ लाख ६१ हजार १०५ मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ३ लाख ४७ हजार ७४९ मतदारांनी आपला हक्क बजावला.
तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पाहता सावंतवाडी (६९.५४%) आणि वेंगुर्ला (६९.०३%) हे तालुके आघाडीवर राहिले. त्याखालोखाल कुडाळ (६०.०८%), डोडामार्ग (५९.८३%), कणकवली (५९.८१%), मालवण (५८.९०%) आणि देवगड (५७.१२%) येथे मध्यम प्रतिसाद नोंदला गेला. वैभववाडी (५४.७९%) येथे तुलनेने कमी मतदान झाले.
प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. शेवटच्या टप्प्यात वाढलेल्या गर्दीमुळे अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून, निकालातून जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.


