शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांची नेरुर देऊळवाडा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सदिच्छा भेटीदरम्यान श्री. रुपेश पावसकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध गंभीर समस्यांकडे नवनियुक्त अधिष्ठातांचे लक्ष वेधले व या समस्या त्वरित सोडवण्याची मागणी केली.बाह्य रुग्ण विभागाच्या (OPD) समोर बांधण्यात आलेल्या गटारात पावसाचे पाणी आणि सांडपाणी एकत्र साचत आहे. यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीचे रोग पसरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. हे सांडपाणी त्वरित वाहून जाण्याची व्यवस्था करावी.महाविद्यालयातील पूर्वाश्रमीच्या डीन (अधिष्ठाता) यांच्या कार्यकाळात खरेदी करण्यात आलेल्या वस्तू व वैद्यकीय साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. या सर्व खरेदी प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
या भेटीप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा नारायणकर तसेच ओरोस येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष परब यांच्यासह अन्य मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांनी मांडण्यात आलेल्या सर्व समस्यांची दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.


