नेरूर / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील नेरूर दुर्गवाड येथील *’फ्रेंड्स ग्रुप, दुर्गवाड’* या युवक मंडळाने सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडवले आहे.
ग्रुपच्या माध्यमातून दुर्गवाड परिसरात *’पाणी अडवा, पाणी जिरवा’* या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवण्यासाठी ठिकठिकाणी मातीचे छोटे बंधारे घालून पाणी साठवण्याचे काम युवकांनी *स्वखर्चातून आणि श्रमदानातून* पूर्ण केले आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील भूजल पातळी कायम राहण्यास मदत होणार असून, येणाऱ्या उन्हाळ्यातील पाणी टंचाईची तीव्रता कमी होण्यास हातभार लागणार आहे.
सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या फ्रेंड्स ग्रुपच्या या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांकडून आणि पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, प्रत्येक गावाने असा उपक्रम राबवणे गरजेचे आहे, असा संदेश या युवकांनी दिला आहे.
“आम्ही तर सुरुवात केली आहे, तुम्ही पण करा” – फ्रेंड्स ग्रुप, दुर्गवाड
फोटो – बंधाऱ्यात साठलेले पाणी आणि श्रमदानानंतर भोजनाचा आनंद घेताना फ्रेंड्स ग्रुपचे कार्यकर्ते.


