जांभवडे हायस्कूल समोर पुन्हा एसटी बस रोखल्या ; एसटी बस प्रशासनाने पोलीस ठाण्यात घेतली धाव

0

कुडाळ | प्रतिनिधी 

जांभवडे न्यू शिवाजी हायस्कूल येथे एसटी बस थांबा मिळावा म्हणून हायस्कूलच्या संस्था चालकांसह विद्यार्थ्यांनी एसटी बस रोको आंदोलन केले. यामध्ये कुडाळ एसटी बस स्थानकाच्या दोन बसेस व कणकवली एसटी बस स्थानकाची एक बस अडकली. दरम्यान एसटी बस आगाराच्या अधिकाऱ्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली यासंदर्भात उशिरापर्यंत तक्रार देण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरु होते.

जांभवडे न्यू शिवाजी हायस्कूल येथे एसटी बस थांबा मिळावा म्हणून गेले काही दिवस हायस्कूलचे अध्यक्ष सुभाष मडव व संस्थाचालक तसेच शिक्षक विद्यार्थी आंदोलन करत आहेत. हा थांबा मिळावा म्हणून पत्रव्यवहार सुद्धा बस प्रशासनाकडे केला मात्र हा थांबा न मिळाल्यामुळे एसटी बस रोको आंदोलन सुरू केले. आहे आज शुक्रवार ४ ऑक्टोंबर रोजी जांभवडे हायस्कूल समोर एसटी बस रोखण्यात आली घोडगे येथून सायं. ४ वाजता सुटणारी कुडाळ येथे येणारी बस रोखण्यात आली. त्यानंतर कणकवली वरून घोडगे येथे जाणारी बस तसेच कुडाळ ते कासारखिंड वस्तीची बस रोखण्यात आली. यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. दरम्यान ही घटना समजल्यानंतर कुडाळ एसटी बस आगाराचे अधिकारी व कर्मचारी यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे धाव घेतली. यावेळी विभागीय कार्यालयाकडून प्रशालेला झालेला पत्रव्यवहार दाखविण्यात आला. या पत्रव्यवहारांमध्ये असे म्हटले आहे की, प्रशालेच्या दोन्ही बाजूने जवळच एसटीचे थांबे आहेत प्रशालेसमोर थांबा देता येत नाही. अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आणि याबाबत एसटी बस प्रशासनाकडून सर्वे करण्यात आला आहे असे पत्र एसटी बस प्रशासनाने प्रशालेला दिले आहे. दरम्यान पोलीस ठाण्यात एसटी बस रोखली म्हणून तक्रार नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. कुडाळ पोलीस ठाण्यावरून जादा पोलीस कुमक जांभवडे येथे पाठविण्यात आली.