सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी
जोपर्यंत अटी शर्तीचे पालन आमच्याकडून होत नाही तोपर्यंत कंपनीचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय आकाश फिश मिल कंपनीच्या व्यवस्थापनाने घेतला तसे पत्र जिल्हाधिकार्यांना दिले. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशिरा केळूस दशक्रोशीतील ग्रामस्थांनी आपले उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
आकाश फिश मिल विरोधात ग्रामस्थ एकवटले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून लक्ष वेधले ग्रामस्थांचा विरोध झुगारुन आकाश फिश मिल अँण्ड फिश ऑईल प्रा. लि. या कंपनीच्या मनमानी कारभाराला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ सहकार्य करीत असल्याचा आरोप केळूस दशक्रोशी ग्रामस्थांनी केला असून या विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण आंदोलन सुरू केले होते. वेंगुर्ला तालुक्यातील केळूस येथील आकाश फिश मिल दुषीत पाणी येथील समुद्रात सोडत असल्याने पर्यावरणाची हानी होत असून प्रदुषण वाढले आहे. याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान या विरोधात ऑगस्ट महिन्यात आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर १६ ऑगस्ट रोजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी या उपोषणास सहभागी होत. पाठिंबा दिला. यावेळी कंपनीने त्रुटींची पुर्तता केल्याची खात्री महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने ग्रामस्थांसह संयुक्तरीत्या करावी आणि त्यानंतर पुढील कार्यवाही करावी असे निर्देश दिले होते. दरम्यान झालेल्या पाहणीत प्रदुषण मंडळाच्या सूचनांचे पालन कंपनीकडून झाले नसल्याची बाब समोर आली. आणि असे असताना १३ सप्टेंबर रोजी प्रदूषण मंडळाचे पाईप लाईनने समुद्रात पाणी सोडण्यास कंपनीला परवानगी दिली असल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे. यामध्ये सेवा सोसायटीचे चेअरमन आनंद गावडे, योगेश शेटे, गोविंद केळुसकर, सुनील पाटील -पाटकर, सूर्यकांत खोत, विश्वास राऊळ आदींसह दशकोशीतील महिला, विद्यार्थी, मुले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
