रत्नागिरी | प्रतिनिधी
साडवली, देवरुख येथे बंद पडलेले विश्वकर्मा सामूहिक सुविधा केंद्र चालू करून लोहारकाम करणाऱ्या कारागिरांना पुन्हा काम मिळण्याकरिता जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हा उद्योग कार्यालयात जाऊन महाव्यवस्थापक प्रकाश हणबर यांना चांगलेच धारेवर धरले. २४ तासांत उद्योग सुरू करण्यासाठी तोडगा काढा, अन्यथा आंदोलन छेडू असा इशाराही सावंत यांनी यावेळी दिला. जयस्तंभ येथे २ ऑक्टोबरपासून उपोषणाला बसलेल्या कमलाकर मसूरकर यांच्याकडून जिल्हाध्यक्ष सावंत पूर्ण माहिती घेतली.
साडवली, देवरूख येथे विश्वकर्मा सामूहिक सुविधा केंद्र चार वर्षे ठप्प आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केंद्राच्या अध्यक्षाने उपोषण सुरू केले. परंतु ज्या उद्योग विभागाने पैसे दिले, मशिनरी दिली त्यांनी पुन्हा उद्योग करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. चार वर्षांत उद्योगच सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे दुःख जाणून घेत भाजपा जिल्हाध्यक्षांनी महाव्यवस्थापकांना फैलावर घेतले. जनरेटवर मशिनरी सुरू करण्यासाठी प्रयत्न करा, आजारी उद्योग म्हणून काही करता येते का, वीज बिल माफीसाठी प्रयत्न करा, अशा सूचना राजेश सावंत यांनी दिल्या. रत्नागिरीचे उद्योगमंत्री असूनही त्यांच्याकडे महाव्यवस्थापकांनी प्रस्तावच न पाठवल्याने नाराजी व्यक्त केली. तरीही उद्योग चार वर्षे बंद असल्याबद्दल खेद व्यक्त केला. आमच्या भाजपा सरकारला बदनाम करू नका, काम करा, प्रश्न सुटला पाहिजे परंतु कारागिरांवर उपासमारीची वेळ आणू नका, असेही राजेश सावंत यांनी ठामपणे सांगितले.
हा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आज उपोषणकर्ते अध्यक्ष कमलाकर मसुरकर यांची भेट घेतली. तिथून महाव्यवस्थापक श्री. हणबर यांना फोन केला. उपोषण मिटवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु महाव्यवस्थापकांची भाषा ऐकून राजेश सावंत यांनी थेट जे. के. फाईल्स येथे जिल्हा उद्योग केंद्रालाच भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे, उमेश देसाई, राजू भाटलेकर, बावा नाचणकर आदी उपस्थित होते.
राजेश सावंत यांनी सुरवातीला महाव्यवस्थापकांना प्रश्नांचा भडीमार करून भंडावून सोडले. उपोषण थांबावे, बंद पडलेला उद्योग चालू राहण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरीचे आहेत. त्यांच्या उद्योग विभागाने दखल न घेतल्याने केंद्राचे अध्यक्ष कमलाकर मसुरकर यांनी २ ऑक्टोबरला उपोषण सुरू केले. गेल्या देवरुख येथेही उपोषण करण्यात आले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली. उद्योगच सुरू झाला नाही आणि मशिनरीचा पार्ट गेला, वीजेचे भरमसाठ बिल आले. लोहारकाम करणाऱ्या कारागिरांनी सव्वा कोटी पदरचे दिले. मात्र चार वर्षांत त्यांना उत्पन्नच मिळाले नाही तर कर्ज परतफेड कशी करणार असे सवाल राजेश सावंत यांनी महाव्यवस्थापकाना विचारले.
श्री. हणबर यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात उपोषण केले होते तेव्हा उद्योगमंत्र्यांकडे हा विषय मांडला होता. अशा विषयात नुकसानभरपाई यात मिळत नाहीत. मशिन ऑपरेटर आम्ही आणला होता. वीज आल्याशिवाय ते होऊ शकले नाही. कोणत्याही योजनेत निधी शिल्लक नसल्याने शासन स्तरावर मागणी केली आहे. आयुक्त कुशवाह यांच्याकडे लेखी प्रस्ताव पाठवला आहे. वीज बिल माफ करण्याबाबत वरिष्ठ निर्णय घेऊ शकतात.
