सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायबर पोलीस ठाणे अंतर्गत १ जानेवारी २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत दाखल गुन्ह्यांमध्ये तक्रारदार यांच्या झालेल्या आर्थिक फसवणुकीपैंकी नॅशनल सायबर क्राईम रिपोटींग पोर्टलद्वारे (NCCRP) रुपये ५८,०९,६१० एवढी रक्कम विविध बँकखात्यांमध्ये गोठविण्यात आलेली आहे. त्यापैंकी तक्रारदार यांना रुपये २१,२७,५१६ एवढी रक्कम परत मिळवुन देण्यात आलेली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात हरवलेल्या मोबाईल तक्रारींपैकी २१७ मोबाईलचा शोध घेण्यात आलेला असुन सदरचे मोबाईल त्यांचे मालकांना परत मिळवुन देण्यात आलेले आहेत.
सायबर पोलीस ठाणे सिंधुदुर्ग तर्फे ऑनलाईन आर्थिक फसवणूक, सोशल मिडीया फ्रॉड, मोबाईल चोरी, मोबाईल हरविणे, सायबर जागृकता या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी (बस स्थानके, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा, पोलीस ठाणे) ८४ बॅनर्स लावुन तसेच लघु चित्रपट (शॉर्ट फिल्म) द्वारे सायबर क्राईम बाबत जनजागृती करण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळा, कॉलेज मध्ये सायबर क्राईम जनजागृती अभियान राबवुन सुमारे ५० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना सायबर व सोशल मिडीयाचा वापर करुन घडणा-या गुन्हांबाबत कशा प्रकारे सावधानता बाळगावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सिंधुदुर्ग पोलीस दला तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी सोशल मिडिया वरील आमिषांना, धमक्यांना तसेच खोट्या लिंकस, फसवे अॅप, अनोळखी कॉल्स, व्हिडीयो कॉल्स वरुन होणा-या फसवणूकीस बळी पडु नये. तसेच अशा प्रकारे फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधुन झालेल्या फसवणुकीबाबत तात्काळ माहीती द्यावी. तसेच नागरीकांनी आपले बैंक खाते, एटीएम कार्ड, क्रेडीट कार्ड, UPI बाबत अनोळखी व्यक्तीस फोनद्वारे अथवा सोशल साईटवर कोणत्याही प्रकारची वैयक्तीक माहीती देऊ नये असे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी म्हटले आहे.
