आंबा, काजू फळपिक विमा देण्यात शासनाचा वेळकाढूपणा ; ९ ऑक्‍टोबरला जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

0

कणकवली | प्रतिनिधी 

आंबा काजू फळ पिक विमा रक्‍कम देण्यास राज्‍य सरकार आणि रिलायन्स कंपनी वेळकाढू पणा करत आहे. या विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्‍वाखाली ९ ऑक्‍टोबरला सकाळी ११ वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतिश सावंत यांनी दिली.

कणकवली येथील विजय भवन येथे श्री.सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्‍यांच्यासोबत काँग्रेस कृषी सेलचे विजय प्रभू, हरकुळ बुद्रुक सरपंच बंडू ठाकूर, युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.सावंत म्‍हणाले, सिंधुदुर्गातील आंबा आणि काजू पीक शेतकऱ्यांना ८८ कोटी रूपयांची फळपिक विमा रक्‍कम मिळणार आहे. मात्र त्‍यासाठी राज्‍य शासनाने आपल्‍या हिश्‍शातील ५५ कोटी रूपये विमा कंपनीकडे भरणा केलेले नाहीत. त्‍यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा रक्‍कम दिलेली नाही.

सावंत म्‍हणाले, राज्‍य शासनाला शेतकऱ्यांबाबत कोणताही कळवळा नाही. तर रिलायन्स ही विमा कंपनी देखील सरकार धार्जिणी आहे. शासन आणि विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा रक्‍कम देण्याबाबत वेळकाढू पणा करत आहे. त्‍याचा आम्‍ही निषेध करतो. तसेच या विरोधात आम्‍ही ९ ऑक्‍टोबरला जिल्‍हाधिकारी कार्यालयावर आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्‍वाखाली धरणे आंदोलन करणार आहोत. ९ ऑक्‍टोबरपूर्वी राज्‍य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली तरीही आमचे आंदोलन सुरू ठेवणार आहोत.असेही ते म्हणाले.

सावंत म्‍हणाले, फळ पिक विमा देण्यासाठी राज्‍य शासनाने गेली तीन वर्षे रिलायन्स ही विमा कंपनी निश्‍चित केली आहे. या कंपनीचे अधिकारी बेजबाबदारपणे वागत आहेत. त्‍यामुळे शासनाने ही विमा कंपनी बदलावी अशीही आमची मागणी आहे. तशी मागणी आम्‍ही जिल्‍हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ९ ऑक्‍टोबरला जिल्‍हाधिकारी कार्यालयात रिलायन्स विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे अशीही मागणी जिल्‍हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्‍यान ९ ऑक्‍टोबरच्या मोर्चात शिवसेना ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनीही या आंदोलनात पक्षभेद विसरून सहभागी व्हावे असे आवाहन श्री.सावंत यांनी केले.