निवडणूकीला पैसा गोळा करण्यासाठीच वृक्ष लागवडीच्या कोटींच्या निविदा – परशुराम उपरकर 

0

कणकवली | प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली येथील कार्यकारी अभियंता कर्यायाने जिल्ह्यातील १३ रस्त्यांवर वृक्ष लागवडीची काढलेली कोट्यावधींची (५० कोटी) निविदा ही विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठेकेदारांकडून निधी गोळा करण्यासाठीच आहे असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. सदरची निविदा जाहीर करून त्याची मुदत १२ऑक्टोबर पर्यंत अवघ्या ४ दिवसांची ठेवण्यात आली आहे. त्यात पुन्हा दोन दिवस सुट्टीचे आहेत, म्हणजेच निविदा ‘ मनेज ‘ करण्याचा हा प्रकार आहे असा आरोपही त्यांनी केला. सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते व इतर कामे सोडून एकदम वृक्ष लागवड करण्याची उपरती कशी झाली..? आतापर्यंत जिल्ह्यात बांधकाम खात्याकडून अशी वृक्ष लागवड झाल्याचे ऐकिवात नाही.शिवाय वनविभाग,कृषी विभाग,सामाजिक वनीकरण विभाग असे कार्यक्रम सातत्याने राबवत असते. त्यांना हा निधी दिला तर आपल्याला फायदा काय या हेतूनेच बांधकाम खात्याने हा ‘उद्योग ‘ हाती घेतला असावा अशी टीका करून उपरकर यांनी निवडणुकीसाठी निधी गोळा करणे हाच यामागचा उद्देश आहे हे स्पष्ट होते असा आरोपही त्यांनी केला. एरवी वृक्ष लागवड ही पावसात केली जाते असे असताना पाऊस संपायला आला असतांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशी निविदा काढणे यात निश्चितच काळेबेरे आहे असा आरोप करून रेल्वे स्टेशन सुशोभिकरण निविदांप्रमाणेच ठेकेदार निश्चित झाले असावेत असा आरोपही उपरकर यांनी केला आहे. वृक्ष लागवडीसाठी जे रस्ते निवडण्यात आले आहेत त्यापैकी काही रस्त्यांच्या रुंदीकरणाला यापूर्वी विरोध झाला आहे.शिवाय मूळातच रस्ते अरुंद असताना वृक्ष लागवडीला जागा कुठे आहे असा सवाल त्यांनी केला.

लागवडीसाठी आवश्यक असलेली तांत्रिक पदे भरण्यात येणार आहेत असे म्हटले आहे.मात्र ती केव्हा भरली जाणार..? असा सवाल उपरकर यांनी केला आहे. ज्या प्रमाणे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची निविदा प्रक्रियाआहे तसाच गोलमाल यातही दिसत आहे.

यापूर्वी जिल्ह्यात १० हजार झाडे लावणार असे कणकवलीचे अभियंता सर्वगोड यांनी म्हटले होते. त्याचे काय झाले…? असा सवाल करून उपरकर म्हणाले, केवळ निविदा काढल्या जातात,ठेकेदारांची बिले थकीत आहेत. ठेकेदारांचे पैसे न दिल्यामुळे आता ते आंदोलन करत आहेतअसे उपरकर म्हणाले.