Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कोंकणकुठल्याही भेदाच्या पलीकडली परंपरा म्हणजे गुरु शिष्य परंपरा ...

कुठल्याही भेदाच्या पलीकडली परंपरा म्हणजे गुरु शिष्य परंपरा …

कवी अजय कांडर, कवयित्री संध्या तांबे यांच्या उपस्थितीत गुरु शिष्य पत्र स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 

साद फाउंडेशनच्या उपक्रमाला विदेशासह- महाराष्ट्रभरातून उस्फूर्त प्रतिसाद 

 

कणकवली | प्रतिनिधी

   आपल्या संस्कृतीत गुरु शिष्य परंपरा फार प्राचीन आहे.मात्र भेदाच्या पलीकडे ज्या गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व जाणले गेले त्याच गुरु शिष्य परंपरेची महती वाढत गेली. संगीत आणि शिक्षण क्षेत्रात तर अशा गुरु शिष्य परंपरेला मोठा वारसा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर साद फाउंडेशनने आयोजित केलेली ही गुरु शिष्य प्रेम पत्र लेखन स्पर्धा फार महत्त्वाची असून याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद थक्क करणारा होता असे प्रतिपादन नामवंत कवी अजय कांडर आणि सुप्रसिद्ध कवयित्री संध्या तांबे यांनी येथे केले.

     ‘ साद फाउंडेशन सिंधुदुर्ग’ ने आयोजित केलेल्या खुल्या गुरु शिष्य प्रेम पत्र स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कवी अजय कांडर आणि कवयित्री संध्या तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला. संस्थेच्या पदाधिकारी तथा लांजा नगरपंचायतच्या प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला, दोडमार्ग प्रशासकीय अधिकारी दिपाली मुंडये नाईक, गोरेश नाईक, संस्थेच्या संस्थापक लतिका नाईक, सचिव सचिन कोर्लेकर, आर्किटेक शंकर सावंत तसेच जिल्हा परिषदेच्या माजी प्रशासकीय अधिकारी सुगंधा देवरुखकर ,संगीत अभ्यासक माधव गावकर, प्रा.जगदीश राणे, स्नेहलता राणे, श्री वनवे, राजेंद्र कदम आदी उपस्थित होते.यावेळी स्पर्धेतील प्रथम,द्वितीय,तृतीय विजेत्या अनुक्रमे पल्लवी शिंदे माने(अमेरिका), मालिनी लाड,तनया पाटील यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकाने आशालता पडवेकर,सुगंधा देवरुखकर,गौरी बांदेकर, सीमा हडकर,सतीश कदम,मधुरा समेळ परब,श्रेयस शिंदे यांना गैरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कवी अजय कांडर आणि कवयित्री संध्या तांबे यांनी काम पाहिले.

  अजय कांडर म्हणाले तब्बल 71 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. महाराष्ट्राच्या विविध भागातून स्पर्धेत लेखक सहभागी झाले यावरूनच या स्पर्धेचे मोल लक्षात येते. एवढा मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे परीक्षक म्हणून काम करताना खूप काटेकोरपणे सर्व स्पर्धकांची पत्रे वाचून पारितोषिके द्यावी लागली. अनेकांनी भरभरून आपल्या गुरु विषयी लिहिले. अनेकांनी गुरूने केलेल्या संस्कारामुळेच आजवर आपला हा प्रवास होऊ शकला अशी भावना व्यक्त केली. मात्र ज्या गुरूंनी विद्यार्थ्याला जीवनदृष्टी खऱ्या अर्थाने दिली त्याच लेखांची पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. सध्या तांबे म्हणाल्या, या स्पर्धेमुळे अनेक लोक लिहिते झाले. 85 वर्षाच्या आजी पासून दहा-बारा वर्षाच्या विद्यार्थ्यापर्यंत अनेकांनी आपल्या गुरुबद्दल भावना व्यक्त करून मन मोकळे केले. ‘ साद फाउंडेशन’च्या या उपक्रमाचे कौतुक करू तेवढे थोडेच. परीक्षण करताना फार कसरत करावी लागली कारण बहुसंख्य पत्र ही उत्तम होती. त्यातून अधिक उत्तम जे लेखन होते त्यांना पारितोषिक देण्यात आली भविष्यात यातील उत्तम लेखांचा ग्रंथ प्रकाशित व्हावा. 

यावेळी गितांजली नाईक सावंत यांनी संस्थेच्या एकूण उपक्रमाचा आढावा घेतला आणि भविष्यात कोणते उपक्रम राबविले जाणार आहेत त्याबद्दलची माहिती दिली. तसेच सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र आणि भेट वस्तू देण्यात आल्या.

   सूत्रसंचलन प्रा. कु.दर्शना पाताडे यांनी तर आभार प्रा.कु.अपूर्वा गोलतकर यांनी मानले. मुंबई सह रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!