सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
मानवी कलेची आद्य अभिव्यक्ती असलेल्या कातळशिल्पांकडे आधुनिक चित्रकाराच्या दृष्टीने पाहून त्यांचे चित्र प्रदर्शन भरवण्याचा चित्रकार ओंकार क्षीरसागर यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी काल पुणे येथे केले.
पुणे येथील महाराष्ट्र कल्चरल सेंटरने सुदर्शन कलादालनामध्ये गोवा येथील चित्रकार श्री. ओंकार क्षीरसागर यांच्या कातळशिल्पांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले होते. त्यावेळी श्री. लळीत बोलत होते. श्री. लळीत म्हणाले की, कोकणातील जांभ्या दगडांच्या सड्यांवर आढळणारी अश्मयुगीन मानवाची कातळशिल्पे ही मानवी कलेची सर्वात प्राचीन आणि पहिली अभिव्यक्ती आहे. या कलेद्वारे तत्कालीन मानवाने आपल्या भावना कातळावर नोंदवून ठेवल्या आहेत. आतापर्यंत या कातळशिल्पांचा अभ्यास पुरातत्वीय दृष्टिकोनातून झाला आहे. परंतु श्री. क्षीरसागर या चित्रकाराने कातळशिल्प या विषयाकडे एक कला या अंगाने पाहिले व त्या दृष्टीने अभ्यास करताना त्यांना भावलेली कातळशिल्पे त्यांनी कँनव्हासवर चितारली. हा एक अत्यंत अभिनव असा उपक्रम आहे. या चित्रांचे प्रदर्शन पुण्यासारख्या कलाप्रिय शहरात भरवल्यामुळे कातळशिल्पांचा प्रसार होण्यासही मदत होणार आहे.
यावेळी पुणे गॅलरी ऑफ व्हिज्युअल आर्ट्स या संस्थेने श्री. क्षीरसागर यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन सुदर्शन रंगमंचावर केले. चित्रकार श्री. प्रमोद काळे यांनी श्री. क्षीरसागर यांची मुलाखत घेतली. कातळशिल्पांमधील रचनांचे विषय, वैविध्य, मांडणी आणि रेखाटने मला आकर्षित करुन गेली. कोणतीही साधने नसताना हजारो वर्षांपूर्वी मानव दगडासारख्या माध्यमातून व्यक्त झाला. हे वेगळेपण जाणवल्याने आपण या विषयाकडे वळलो, असे श्री. क्षीरसागर म्हणाले. यावेळी पुरातत्व शास्त्रज्ञ व पर्यावरण अभ्यासक सायली पलांडे दातार, डॉ. नितीन हडप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चार दिवस सुरु असलेल्या या चित्रप्रदर्शनाला शेकडो नागरिकांनी भेट दिली.
