कुडाळ | प्रतिनिधी
भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शब्द दिला आहे की इकडची भारतीय जनता पक्ष संपून इकडे शिंदेसेना वाढवतो, हा शब्द दिल्यामुळे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री शिंदेने राणेंच्या मुलाला तिकीट दिलेले आहे हे सर्वाना माहिती आहे, असा टोला माजी आमदार व उबाठा शिवसेनेचे नेते परशुराम उपरकर यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत राणे यांना लगावला तसेच राणे यांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत त्यामुळे त्यांना निष्ठावंतचा अर्थ कळणार नाही, त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या निष्ठेबद्दल बोलू नये असेही ते म्हणाले.
कुडाळ शिवसेना शाखा येथे परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना उपरकर यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली ते म्हणाले की राणे कडून निष्ठावंत हा शब्द गेलेला आहे, आणि म्हणूनच वैभव नाईक यांच्या वरती सातत्याने निष्ठावंत कसला अशा प्रकारची ते टीका करीत आहेत. राणे यांनी अनेक पक्ष बदललेले आहे आणि आता त्यांना त्यांचे कार्यकर्ते सोडू लागले आहेत. निष्ठावंतांची राणे यांनी निष्ठेची व्याख्या आणि आपण निष्ठेमध्ये काय काय केले ते लोकांना सांगावे.
वैभव नाईक सातत्याने मुख्यमंत्र्याकडे पक्ष प्रवेशासाठी जात होते, पण मी त्यांना नको म्हटले म्हणून त्यांना घेतले नाही असे सांगणारे राणे यांनी आपण जे प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांना भेटत होता ते कशासाठी? आपल्या मुलाचं पुनर्वसन करण्यासाठी असा प्रश्न उपस्थित करीत आपला मुलगा खासदार होता त्यानी त्यावेळी काय विकास कामे केली? जिल्हा नियोजन बैठकीला ते वडील पालकमंत्री असल्यामुळे येत होते, पण तोंडावर अगदी बोट ठेवत होते पण रत्नागिरीच्या ठिकाणी भास्कर जाधव मंत्री असताना त्या जिल्ह्यामध्ये एकदाही डीपीडीसीला गेलेले नाहीत असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे राणेंना विकासाची काय व्याख्या समजणार आहे, त्यामुळे राणेंनी आपल्या मुलासाठी जेवढं काय सांगायला जातील तेवढे उलटे त्यांच्या बाबतीत आमच्याकडे विषय आहेत, कारण या त्यांच्या मुलाला विकास समजलाच नाही. आणि आता तर नीलेश राणे यांना निवडणुकीत उभा करून राणे यांनी भारतीय जनता पक्ष संपवण्याचा विडा घेतलेला आहे हे सर्वांना माहिती आहे.
आता राणेनी आपल्या मुलाचं सांगावं दुसऱ्याच्या निष्ठेबद्दल किंवा वैभव नाईक यांच्या बद्दल बोलू नये. मुख्यमंत्र्यांना राणे यांनी शब्द दिलेला आहे की मी इकडची भाजपा संपवून इकडची शिंदेसेना वाढवतो हा शब्द दिल्यामुळे खऱ्या अर्थाने शिंदेने तुमच्या मुलाला तिकीट दिलेले आहे हे सर्वाना माहिती आहे. त्यामुळे राणेकडे विकासाचा मुद्दा राहिलेला नाही, आहे केंद्रीय मंत्री असताना खासदार निवडून आल्यानंतर कोणकोणत्या गावात आणि कोण कोणत्या तालुक्यात गेले याची माहिती सांगावी, राणेंचे रिचार्ज आता संपलेले आहे, त्यांना जनताच धडा शिकवेल असे ही ते म्हणाले.
राणे यांनी २००५ साली शिवसेना औषधाला ठेवणार नाही असे सांगणाऱ्या राणेना नियतीने व परशुरामाच्या भूमीने परत धनुष्यबाण हातात घ्यायला लावलाय, तो पण चोरलेला धनुष्यबाण आहे हे राणे आणि सदैव ध्यानात ठेवावं व येथून पुढे जशास तसे उत्तर आम्ही त्यांना देऊ असा इशाराही त्यांनी दिला.
