अपक्ष उमेदवार नवाज खानी यांचा टोला ; सर्वधर्मियांच्या हितासाठीच मी निवडणूक रिंगणात
कणकवली | प्रतिनिधी
शिवसेना उबाठाचे मुस्लिम बांधव पदाधिकारी आहेत त्यांनी मला सल्ले देऊ नयेत. मी अपक्ष निवडणूक लढवत असून केवळ मुस्लिम समाजच नाही तर सर्वधर्मियांच्या हितासाठी मी निवडणूक लढवत आहे. मला ओळखत नाही म्हणणाऱ्या शिवसेना उबाठाच्या मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांना माझ्यावर बोलण्याची वेळ का आली? याचे परीक्षण करावे असा सल्ला देतानाच आम.नितेश राणे आणि संदेश पारकर यांनी मला हलक्यात घेऊ नये.असा इशारा कणकवली विधानसभा मतदार संघातील बॅट निशाणीवर निवडणुक लढविणारे अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
कणकवली येथे पत्रकारांशी नवाज खानी बोलत होते.यावेळी सादिक धोपावकर, आदिल खतीब, साहिल चौगुले, रोहित पटाडे, विनायक जाधव उपस्थित होते. श्री. खानी म्हणाले, आम.नितेश राणे आणि संदेश पारकर यांनी मला हलक्यात घेऊ नये. 2019 मध्ये 34 मतांनी विजयाचे पारडे फिरले होते. मला बॅट निशाणी मिळाली असून नितेश राणे आणि संदेश पारकर या विरोधी उमेदवारांनी हवी तशी बॉलिंग करावी मी 6 चेंडूत 6 सिक्सर मारायला सज्ज झालो आहे. मी उमेदवारी अर्ज मागे घेणार अशी स्वप्ने बऱ्याच लोकांना पडत होती. माझी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. काल ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी असलेल्या मुस्लिम बांधवांनी पत्रकार परिषदेत मला उमेदवारी मागे घेत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा अनाहूत सल्ला दिला. मात्र जे शिवसेना उबाठाचे मुस्लिम बांधव पदाधिकारी आहेत त्यांनी मला सल्ले देऊ नयेत. वास्तविक या माझ्या समाज बांधवांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा देणे आवश्यक आहे.
यावेळी पुढे बोलताना नवाज खानी म्हणाले , शिवसेना उबाठा च्या मुस्लिम समाज बांधवाना मला उमेदवारी मागे घेण्यासाठीची पत्रकार परिषद घेण्यास संदेश पारकर यांनीच सांगितले होते. पत्रकार परिषद घेणारे सर्व माझे समाजबांधव हे आतून माझेच समर्थक असल्याचेही नवाज खानी यांनी सांगितले. संदेश पारकर हे आमदार नितेश राणे यांचेच माणूस आहेत. येत्या 10 नोव्हेंबर रोजी आणखी कोण कोणाचा माणूस आहे हे मी पुराव्यांनीशी जाहीर करून पोलखोल करणार असल्याचा इशाराही नवाज खानी यांनी दिला.
आपल्या भारत देशाचा झेंडा हा तिरंगा आहे ज्यात भगवा, सफेद आणि हिरवा रंग सामील आहे. हाच सर्वधर्मसमभाव हा विचार घेऊन मी विधानसभा निवडणूक लढवत आहे. मी देवगड वैभववाडी कणकवली तालुक्यात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. मला मतदारसंघात फिरताना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत जनतेच्या कार्यकर्त्यांच्या मी गाठीभेटी घेत आहे. कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील जनतेला लाडका आमदार आणि सेटलमेंट करणारा आमदार नको असून खऱ्या अर्थाने विकास करणारा आमदार हवा आहे. मला जनतेच्या मनातील आमदार व्हायचे आहे. माझ्यासाठी नाही तर जनहितासाठी मी निवडणूक रिंगणात आहे असेही नवाज खानी यांनी सांगितले.
