चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे जेष्ठ नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षणाचा त्या काळात विचार का केला नाही ? खासदार नारायण राणे यांचा सवाल 

0

पावशी येथे संपन्न झाला कुडाळ तालुका भाजप कार्यकर्ता मेळावा

कुडाळ | प्रतिनिधी 

ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होऊन गेले त्या काळामध्ये त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे वाटले नाही महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा विचार आला नाही अशा शब्दात भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा समाचार घेऊन सुसंस्कृतपणा आम्हाला शिकवू नये तसेच घराणेशाहीचा आरोप करताना गांधी, पवार, ठाकरे या घराण्यांनी आपल्या घराणेशाही बाबत बोलावे असा टोलाही त्यांनी पावशी येथील कुडाळ तालुका भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात लगावला. 

कुडाळ तालुका भाजपचा कार्यकर्ता मेळावा पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालय येथे संपन्न झाला यावेळी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, महायुतीचे उमेदवार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार,भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा निरीक्षक जयंत जाधव, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, राजू राऊळ, मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल रूपेश कानडे, महिला मोर्चाच्या अध्यक्ष आरती पाटील, आनंद मेस्त्री, अशोक सावंत, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दिपक नारकर, श्री शेठ आदी उपस्थित होते.

या मेळाव्यावेळी खासदार नारायण राणे यांनी सांगितले की, युद्ध आणि निवडणूक सारखी आहे जोपर्यंत आपण विजयी होत नाही तोपर्यंत लढत राहिला पाहिजे. सगळ्या प्रकारे आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न केला जाईल. पण शांततेत आणि आपल्या महायुतीने केलेली विकास कामे लोकांपर्यंत घेऊन जाऊन महायुतीला कसे मतदान होईल हे पाहिले पाहिजे. असे सांगून उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व पणाला लावले हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असले असते तर हिंदुत्व पणाला लावणाऱ्या उद्धव ठाकरे याला गोळ्या घातल्या असत्या असे सांगून येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे २५ आमदार निवडून येतील असे त्यांनी यावेळी सांगितले. 

उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत जो शिवसेनेचा कार्यकर्ता नावारुपाला आला त्याला संपवण्याचे काम त्यांनी केले. त्याच्याबद्दल बदनामी करणे अपशब्द वापरणे आणि संघटनेतून घालून देणे हे फक्त पैशांसाठी आणि सत्तेसाठी त्यांनी केले. कोकणात एकही प्रकल्प त्यांनी आणला नाही. राजकारणात व प्रशासनातील अज्ञानी माणूस म्हणून उद्धव ठाकरे आहेत हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे वयोवृद्ध झाले तरी ते तरुण होते त्यांच्या वाणीतून निखारे वाहत होते. त्यांनी कधीही सत्तेसाठी हिंदुत्व गहाण ठेवले नाही असे यावेळी सांगून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा समाचार घेतला सुसंस्कृतपणा आम्हाला त्यांनी शिकवू नये त्यांची कुंडली माझ्याजवळ आहे. स्वतः चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले पण एकदाही त्यांच्या मनात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार आला नाही तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा विचार आला नाही. आता मात्र तो विचार येत आहे. गेल्या अडीच वर्षात महायुतीने केलेल्या कामांवर टीका केली जात आहे पण या सरकारने लोककल्याणीकारी व लोकहितवादी योजना आणल्या आहेत. त्या विरोधकांना सहन होत नाही असे त्यांनी सांगून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि खासदारकीला मिळालेल्या मताधिक्यापेक्षा दुप्पट मताधिक्य मिळवण्यासाठी प्रत्येकाने कंबर कसा असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले.

तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे स्वतः मी उमेदवार आहे. असे मानून काम केले पाहिजे या मतदार संघाचे आमदार हे निलेश राणे असतील हे मी दोन वर्षांपूर्वी सांगितले होते आणि त्यावेळी त्यांच्याजवळ ही जबाबदारी दिली त्या जबाबदारीने निलेश राणे यांनी गावागावात जाऊन प्रलंबित विषय आमच्यासमोर आणले आणि त्यासाठी आम्ही निधी मिळवून दिला. हे सामान्यांचे सरकार आहे सामान्यांसाठी योजना राबविल्या गेल्या त्या योजना घरापर्यंत गेल्या पाहिजेत. आपले बूथ सक्षम केले पाहिजे म्हणजे आपल्याला मतदानाचा टक्का वाढू शकतो आता कोणीही हेवेदावे न ठेवता कुरगुड्या न करता काम केले पाहिजे सगळे वाद विसरून एकजुटीने काम करून निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. निवडणुकीसाठी वातावरण तयार केले पाहिजे म्हणजे जे काठावरचे मतदार आहेत ते वातावरण पाहून आपल्या बाजूने मतदान करतील असे त्यांनी सांगितले.

या मेळाव्यामध्ये महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी सांगितले की, या मतदार संघामध्ये खासदार नारायण राणे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे त्यांनी केलेल्या कामाचा ठसा कायम ठेवण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये उभा राहिलो आहे. या मतदार संघाला आदर्शवत असा मतदार संघ बनवणार, माझ्या मतदारसंघातील जनतेची मान वाकणार नाही असे काम मी करणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी चांगले काम केल्यामुळे २७ हजार मताधिक्य मिळाले. ही टक्केवारी आपल्याला वाढवायची आहे. पण तेवढेच सावध राहायचं आहे आता वेगवेगळ्या प्रकारे अफवा पसरवल्या जातील पण कोणीही उत्तर न देता आपले काम केले पाहिजे. कोणत्याही प्रकारची चूक आपल्याकडून होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे आणि मी तशी सर्वांना विनंती करतो काय झालं तरी आपल्याकडून चूक होणार नाही याची खबरदारी घ्या. कारण ज्याचं जळतं त्याला कळतं, यावरून समजून जा गेल्या दहा वर्षात आपल्या मतदारसंघाचा कोणत्या प्रकारचा विकास झाला हे सर्वांना ठाणकावून सांगा तसेच नेत्यांसोबत न फिरता आपल्या गावातच राहा आणि मतदान कसे वाढेल याकडे लक्ष द्या असे आवाहन करून आपल्याला मतदारसंघांमध्ये चांगली आरोग्य सेवा, स्पोर्ट्स क्लब अशा विविध सुविधा निर्माण करायचे आहेत. शेतकरी असो किंवा मच्छीमार यांच्या अर्थकारणामध्ये बदल घडतील यासाठी आपल्याला काम करायचं आहे. कुठेही शासकीय ठेके घेऊन ठेकेदार बनायचं नाही. आपल्या कार्यकर्त्यांना मोठं केलं पाहिजे असे सांगून कोणत्याही प्रकारे या मतदारसंघातील जनतेची मान वाकणार नाही असे मी काम करेन अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी या मेळाव्यामध्ये दिले. 

या मेळाव्याचे सूत्रसंचालन मंडल अध्यक्ष दादा साईल, प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनी केले तर आभार मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी मानले.