कुडाळ | प्रतिनिधी
जमीन जागेच्या वादातून बहीणीच्या त्रासाला कंटाळून भाऊ रामचंद्र हनुमंत राऊळ ( ४२ रा. कुडाळ आंबेडकरनगर ) यानी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. भाऊ व बहिणीमध्ये जमिनीच्या हिश्यावरून वाद होते असे रामचंद्र राऊळ यांच्या पत्नी संजना राऊळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामचंद्र राऊळ याला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी बहीण पुजा योगेश गावडे (रा. माड्याचीवाडी) यांच्यावर कुडाळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. ही मंगळवारी दुपारी १२.४५ वा दरम्यान घडली.
या घटनेची फिर्याद पत्नी संजना रामचंद्र राऊळ ( ४२, रा. कुडाळ डॉ. आंबेडकरनगर ) कुडाळ पोलिसात यांनी दिली आहे. यानुसार त्याचे कुडाळ लक्ष्मीवाडी येथे इस्त्रीचे दुकान आहे.या दुकानात त्या सकाळी जाऊन संध्याकाळी घरी येतात. मंगळवारी सकाळी त्या दुकानात गेल्या होत्या. यादरम्यान पती रामचंद्र राऊळ हे पत्नीच्या दुकानात गेले होते. यावेळी पत्नी संजना हीच्या भावाची पंम्चर झालेली गाडी दुरुस्त करून पत्नीचा मोबाईल घेऊन आपल्या घरी गेले. यानंतर दुपारी रामचंद्र राऊळ यांच्या फोनवर फोन केला त्यावेळी फोन लागत होता. यानंतर पत्नी संजना ही घरी आली. यावेळी दरवाजा उघडून आत गेल्या. यावेळी आतील एका खोलीचा दरवाजा बंद आढळला. यानंतर मागुनही दरवाजा आतुन बंद आढळला. यावेळी तिने आपल्या जवळच्या नातेवाईकांना बोलवून घेतले. तसेच शेजारच्या लोकांनाही बोलवून घेतले. यावेळी भावाने खिडकीतून डोकावून पाहिले असता रामचंद्र राऊळ यांनी घराच्या छताला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले. यानंतर आतामध्ये गेल्यावर एका स्टण्डवर एक चिट्ठी आढळली. यात बहिण पुजा हिच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझे मृत्यूस बहीण पूजा कारणीभूत आहे असे लिहिलेले आढळले. पत्नी संजना हिने चिठ्ठीची खात्री केली असता चिठ्ठीवरील अक्षर व सही पती रामचंद्र राऊळ यांचीच असल्याचे निष्पन्न झाल्याचे पत्नी संजना राऊळ यांनी कुडाळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादीनुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नणंद पुजा योगेश गावडे हिच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे करीत आहेत.
