राजन तेलींनी लोकांना भडकावण्याचे काम केले ; महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर

0

सावंतवाडी | प्रतिनिधी 

वेळागर येथील ताज प्रकल्पासाठी भूसंपादन करून 28 वर्षे झाली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्यानंतर मी तीन दिवसात प्रकल्प मंजूर केला. तेथील जमिनीवर कोणतेही बांधकाम करण्यात येणार नाही याबाबतचे लेखी पत्र त्यांना दिलेले आहे. राजन तेलींनी लोकांना भडकावण्याचे काम केले असून याला तेच जबाबदार आहेत अशी टीका महायुतीचे उमेदवार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.

सावंतवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी उबाठा गटाने जाहीर केलेल्या पत्रकाची पोलखोल केली. महायुतीने लोकांसाठी अनेक योजना दिल्या आहेत. त्यामुळे आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन श्री. केसरकर यांनी मतदारांना केले.

यावेळी श्री. केसरकर म्हणाले, आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना पत्रक जाहीर केले. माझ्यावर सावंतवाडीची जनता प्रेम करते. सर्व औद्योगिक कारखाने मी आणले. पै काणे यांनी तेथे कारखाने उभारले. चष्म्याचा कारखाना वाफोली येथे उभारण्यात येणार होता. येथील जनरेटर कारखान्यात 600 मुलं काम करत आहे. येथे काही काळात सुरू होणाऱ्या सोलर कारखान्यामध्ये 240 अश्या एकूण 840 नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

सावंतवाडी येथील डाटा सेंटरमध्ये काम करणार मुलांचे थकीत पगार मी मिळवून दिले. माझ्याकडे येणाऱ्या औद्योगिक कंपन्यांना मी मदत करण्याचे काम करतो. काजू कारखानदारांना 280 कोटी रुपये मंजूर करून दिले. रत्नसिंधू मधून सावंतवाडी टर्मिनसच्या पाणीप्रश्नी सहा कोटी रुपये मंजूर केले. जीपी विमानतळ सुरू करण्यासाठी मी प्रयत्न केला मात्र तेथे पुरेशी विमाने येत नाहीत. विमानांची संख्या वाढल्यानंतर तेथेही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तिलारी येथील युवकांना रोजगारसबंधी वन टाइम सेटलमेंट करून दिली. वेळागर येथील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले. मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल ही माझी संकल्पना असून त्यासाठी निधी मी आणला. त्याचे टेंडर, वर्क ऑर्डर झालेली असून एक सही झाली की याचे काम सुरू होईल. बांबोळी, बेळगाव येथील केएलई हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना मंजूर करून घेतली आहे. त्यामुळे रुग्णांना तेथे पैसे भरण्याची गरज नाही असे त्यांनी सांगितले. 

विरोधक माझ्या संपत्तीवरून टीका करत आहे. मात्र माझी संपत्ती ही वडिलोपार्जित आहे. माझ्याकडील जमिनींचे दर दुप्पट झाल्याने संपत्तीत वाढ झाली आहे. विकासासाठी माझ्या जमिनींची विक्री केली आहे. लाकडी खेळण्याचे संवर्धन करण्यासाठी येथे म्युझियम उभारण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडी डेपो आणि एसटी स्टँड नवीन करण्यासाठी सहा कोटींचा निधी मी दिला आहे. लँडमाफीया उमेदवार निवडणुकीसाठी उभा आहे. मी सासोली येथील ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांचा जमीन प्रश्न सोडवणार आहे. मी कोल्हापूरचा पालकमंत्री असलो तरी सिंधुदुर्गचा फायदा झाला आहे. ठराविक झाडे कापण्यासाठी वगळण्यात येतील. त्यामुळे दंड आकारता येणार नाही. माझा मायनिंगला विरोध आहे. शिरशिंगे येथील धरणाला 600 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे तसेच पारपोली येथे फुलपाखरांचे गाव वसविण्यात आले आहे.