कणकवली | प्रतिनिधी
भाविक भक्तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला भाविक भक्तांची अलोट गर्दी होत आहे. या महोत्सवामुळे अवघी कनकनगरी भक्तीरसात न्हावून निघाली आहे. या महोत्सवाचे विशेष आकर्षण आहे ते म्हणजे नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन महोत्सवाचे. कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची उपस्थिती लक्षणीय असते. विविध विषयांवरील कीर्तनाने भाविक भक्त मंत्रमुग्ध होत आहेत.
पुण्यतिथी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बुधवारी सायंकाळी कीर्तनकार ह.भ.प. लक्ष्मीप्रसाद पटवारी (रा. बीड) यांनी शिवसमर्थ योग याविषयावर कीर्तन सादर केले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सायंकाळी कीर्तनकार ह.भ.प. सौ. नम्रता निमकर (रा. पूणे) यांनी गावबा (संत एकनाथ महाराज) या विषयावर कीर्तन सादर केले. तर शुक्रवारी सायंकाळी कीर्तन चंद्रीका ह.भ.प. सौ. मानसी बडवे (रा. पूणे) यांनी ब्रह्मानंद महाराज या विषयावर कीर्तन सादर केले. शनिवारी सायंकाळी कीर्तनकार ह.भ.प. मोहक रायकर (रा. डोंबिवली) यांचे श्रीराम भक्त शबरी याविषयावर कीर्तन होणार आहे. कीर्तने ऐकण्यासाठी विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. उत्सवाच्या प्रत्येक दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक समाधी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. रविवारी बाबांचा पुण्यतिथी दिवस असून या दिवशीही भाविक भक्तांची उपस्थितीती लक्षणीय असणार आहे.
