कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक बुधवारी पार पडली. यात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये बांधकाम व पर्यटन समिती सभापतीपदी उदय मांजरेकर, आरोग्य शिक्षण व स्वच्छता समिती सभापतीपदी मंदार शिरसाट तर महिला व बालकल्याण समिती सभापती पदी आफरीन करोल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हि निवड प्रक्रिया न.पं. कार्यालयात झाली. यावेळी पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (महसुल) सौ. ऐश्वर्या काळुशे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी अरविंद नातू व महाविकास आघाडी आणि भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. यावेळी सभापती पदांसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले. या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया झाली. त्यानंतर विषय समिती सभापती निवड प्रक्रिया झाली. यावेळी महाविकास आघाडी तर्फे गटनेते मंदार शिरसाट व भाजपाचे गटनेते विलास कुडाळकर यांनी आपआपल्या पक्षाच्या नगरसेवकांची नावे विषय समितीमध्ये घेण्याचे पत्राद्वारे सुचविली.
उपनगराध्यक्ष हे पाणी पुरवठा, जलनिस्सारण व बाजार समितीचे पदसिध्द अध्यक्ष असतात. त्यामुळे या समिती सभापती पदी उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांची तर सदस्य पदी नगरसेविका ज्योती जळवी व नयना मांजरेकर यांची निवड करण्यात आली. बांधकाम व पर्यटन समिती सभापती पदी उदय मांजरेकर यांची तर सदस्य पदी नगरसेविका श्रुती वर्दम व प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची निवड करण्यात आली. आरोग्य, शिक्षण व स्वच्छता समिती सभापती पदी मंदार शिरसाट यांची तर या समितीच्या सदस्य पदी नगरसेविका सई काळप व नगरसेवक अभिषेक गावडे यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समिती सभापती पदी नगरसेविका आफरीन करोल यांची निवड करण्यात आली. सदस्य पदी नगरसेविका श्रेया गवंडे व चांदणी कांबळी यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीचे पदसिध्द अध्यक्ष नगराध्यक्ष असतात तर विषय समिती सभापती हे सदस्य असतात. त्यामुळे या समितीच्या अध्यक्षपदी अक्षता खटावकर यांची तर सदस्य पदी विषय समिती सदस्य पदी किरण शिंदे, उदय मांजरेकर, मंदार शिरसाट व आफरीन करोल यांची निवड करण्यात आली. यावेळी पिठासीन अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी ही निवड जाहिर करून नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले.
