राजीनामा देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांवर दबाव ?
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी श्री देव कुडाळेश्वर मंदिरात घेतली एक संघ राहण्याची शपथ
कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीच्या सत्ताधारी नगरसेवकांनी श्री देव कुडाळेश्वर मंदिरात जाऊन श्रीफळ ठेवून आम्ही एक संघ राहू अशी शपथ घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे येत्या काळामध्ये सत्ताधारी पक्षातील नगरसेवक फुटू शकतात या भीतीने ही शपथ घेतल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांना सोमवार १६ डिसेंबर रोजी राजीनामा देण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांकडून व पक्षाच्या नेत्यांकडून दबाव आणला जात आहे.
कुडाळ नगरपंचायतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व काँग्रेस पक्षाची सत्ता आहे या दोघांमध्ये पहिली अडीच वर्ष काँग्रेसचे नगराध्यक्ष असतील आणि उपनगराध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक असतील असे ठरले होते अडीच वर्षांमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष पद भूषविले पण आता पुढील अडीच वर्षासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक झाले आहेत मात्र हा कालावधी त्यांना फक्त दोन वर्षाचा मिळणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. या नाराजीमुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नगरसेवकांमधून होत होती. दरम्यान आता नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांना राजीनामा देण्यासाठी दबाव तंत्र वापरले जात आहे कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा १८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे या सभेपूर्वी म्हणजे उद्या सोमवार १६ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष यांनी राजीनामा द्यावा आणि हा कारभार उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांच्याकडे द्यावा अशी मागणी होत आहे या संदर्भात काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा आफरीन करोल व नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी काँग्रेसचे माजी मंत्री बंटी पाटील यांची भेट घेतली असून यासंदर्भात त्यांनी चर्चा केली आहे त्यांनी सुद्धा राजीनामा देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे त्यामुळे नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया लवकरच पार पडणार असल्याचे संकेत देण्यात येत आहे.
