कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात आपल्या मुलीला कंत्राटी पद्धतीने नगरपंचायतीमध्ये भरती प्रक्रियेत नियुक्ती दिली. या विरोधात भाजपचे नगरसेवक रामचंद्र उर्फ निलेश परब यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांना अपात्र ठरवावे अशी मागणी केली आहे.
कुडाळ नगरपंचायतीमध्ये विविध विभागांकरिता कुशल, अर्धकुशल व कुशल मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यामुळे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी जाहीर निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री. साईराज बेरोजगार सहकारी सेवा संस्था मर्यादित मुंबई व खुशी एंटरप्राइजेस सावंतवाडी यांच्या समान दराच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी खुशी इंटरप्राईजेस सावंतवाडी यांची निविदा दि. ११ मार्च २०२४ रोजी स्थायी समितीच्या ठरावांमध्ये मंजूर करण्यात आलेली आहे. या स्थायी समितीमध्ये उपनगराध्यक्ष किरण शिंदे हे पदसिद्ध सदस्य असून त्यांनी या निविदेला अनुमोदक दिले आहे. या प्रक्रियेमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग दिसून येत आहे. श्री किरण शिंदे यांनी जाणीवपूर्वक खूशी इंटरप्राईजेस सावंतवाडी या संस्थेला हेतू पुरस्कार ही निविदा मंजूर केली आणि १३ मार्च २०२४ रोजी कार्यारंभ आदेश दिला. या खुशी इंटरप्राईजेस सावंतवाडी संस्थेमध्ये त्यांची मुलगी शिवानी किरण शिंदे हिला नियुक्ती देण्यात आली. नगरपंचायतीमध्ये सध्या ती कार्यरत आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि पदाचा गैरवापर करून ही नियुक्ती करण्यात आली आहे. सदर बाब गंभीर असून त्यामुळे नगरपंचायतीचे नुकसान संभवते. मुंबई न्यायालयाच्या दत्तात्रय पिठले विरुद्ध विभाकर गोखले या न्याय निर्णयांमध्ये देखील अशा प्रकारे परिस्थिती असल्याने नियुक्त नगरसेवक अपात्र ठरविण्यात आलेले आहेत. सदरची भरती करतेवेळी किरण शिंदे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी भाजपचे नगरसेवक रामचंद्र उर्फ निलेश परब यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
