फळविक्रेत्याला केले पोलिसांच्या स्वाधीन
कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ शहरापासून जवळच्या पिंगुळी गावात रविवारी फळविक्रीसाठी आलेल्या या परजिल्ह्यातील विक्रेत्याची ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पिंगुळीवासियानी पोलखोल केली.
पिंगुळी भागात आलेला विक्रेता निकृष्ट दर्जाची फळे विक्री करीत होता. या फळांना किडे पडून त्यावर बुरशीसुद्धा आली होती. याबाबत सेना कार्यकर्ते आणि नागरिकांनी फळविक्रेत्यांना कुडाळ पोलीस स्टेशन येथे आणून ताब्यात दिले.
पिंगुळी येथे एक परजिल्ह्यातील विक्रेता जीपमध्ये फळविक्री करीत असून ती फळे निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती शिवसेनेचे गंगाराम सडवेलकर, दीपक गावडे, बाबल गावडे यांना समजली. याची माहिती तत्काळ पोलीस पाटील सतीश माडये, सरपंच अजय आकेरकर आणि पोलिस प्रशासनाला देण्यात आली. याबाबत कुडाळ पोलीस शाम भगत यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देत फळविक्रेत्याच्या वाहनाची तपासणी केली. यावेळी अधिकर फळे सडलेली आढळून आले. त्यामुळे सदर विक्रेता आणि त्याचे फळांसहीत वाहन कुडाळ पोलिसात आणण्यात आले. याप्रकरणी कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी फळांची पाहणी केली. त्यांना सुद्धा ही फळे निकृष्ट दर्जाची आढळली. त्यामुळे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी फळविक्रेत्यास चांगलेच फैलावर घेतले. तसेच पुन्हा असा प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. तर पिंगुळी सरपंच अजय आकेरकर आणि पिंगुळी व्यापारी संघटना उपाध्यक्ष दीपक गावडे यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांची भेट घेऊन असे फळविक्रेते पुन्हा पिंगुळी गावात आल्यास स्थानिक आक्रमक होतील, असे स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या परजिल्ह्यातून फळविक्रेते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हे फळविक्रेते महामार्गाच्या बाजूला किंवा बाजारपेठेपासून लांब अंतरावर आपले वाहन लावून फळांची विक्री करतात. यामध्ये सफरचंद, चिकू, पेरू, डाळिंब, संत्री, द्राक्ष यांची कमी किमतीत विक्री करतात. त्यामुळे स्थानिक नागरिक सुद्धा या फळांची खरेदी करतात. पण ही फळे निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर आले आहे.
