सामाजिक व आर्थिक न्याय लोकांपर्यंत पोहोचणे काळाची गरज ; उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन बोरकर

0

कुडाळ | प्रतिनिधी 

महाराष्ट्र सारख्या विकसित राज्यातील लोकांना कामासाठी स्थलांतर व्हावे लागते ही परिस्थिती गंभीर असेल तर घटनेला अभिप्रेत आपल्याकडून काम होत आहे का ? हा प्रश्न सर्वांनी स्वतःला विचारणे गरजेचे आहे. सामाजिक व आर्थिक न्याय लोकांपर्यंत पोहोचणे काळाची गरज आहे. असे आवाहन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या विधी सेवा आणि शासकीय सेवा योजनांच्या महाशिबिरामध्ये केले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे विधी सेवा आणि शासकीय सेवा व योजनांचे महाशिबिर कुडाळ एमआयडीसी येथील बॅ नाथ पै शिक्षण संस्था येथे आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन भारतीय घटनेच्या उद्देशिकाचे पूजन करून दिपप्रज्वलनाने करण्यात आले. या महाशिबिराला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन बोरकर, जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत गायकवाड, जिल्हाधिकारी अनिल पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई, जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संपूर्णा कारंडे, कुडाळ तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राजश्री नाईक तसेच जिल्हा न्यायाधीश श्रीमती जोशी, श्रीमती देशमुख, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, बार कौन्सिलचे सचिव यतीश खानोलकर, अविनाश परब तसेच सर्व वकील लाभार्थी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन बोरकर यांनी सांगितले की, हे जे शिबिर आयोजित केले आहे या माध्यमातून खऱ्या लाभार्थीपर्यंत आपण गेलं पाहिजे जिल्हाधिकारी यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून खऱ्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ कसा मिळेल याकडे लक्ष दिला पाहिजे याबाबत सांगायचे झाले तर नंदुरबार या जिल्ह्यामधील अनेक लोक कामानिमित्त गुजरात मध्ये जातात सहा महिने त्या ठिकाणी काम करतात पण त्यांची ती मजबुरी असते अशा प्रकारचे स्थलांतर हे विकसित असलेल्या महाराष्ट्र राज्याला शोभेचं नाही रोजगार हमी योजना होती या योजनेमध्ये मजुरी वेळेत मिळत नव्हती म्हणून लोक काम करत नव्हते अशा अनेक घटना आहेत ज्यामध्ये आपण राज्यघटनेने दिलेले आणि राज्यघटनेला अभिप्रेत असलेली सामाजिक व आर्थिक न्यायव्यवस्था उभारू शकलो नाही या कार्यक्रमापूर्ती विचार न करता भविष्यात लाभार्थी कुणी चुकू नये याकडे लक्ष दिला पाहिजे अनेक योजना सुरू होतात बंद होतात न्यायालयात लोक जातात लोकांना पोलीस ठाणे आणि न्यायालयात जाण्याची वेळ येऊ नये याकडे सर्वांनीच लक्ष दिला पाहिजे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तर कायद्याची जनजागृती नाही त्या ठिकाणी लग्नाचे वय किती असले पाहिजे हे सुद्धा माहिती नाही जोपर्यंत आपण खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना लाभ देत नाही तोपर्यंत कामासाठी होणारे स्थलांतर थांबणार नाही असे सांगून आता सर्वांची जबाबदारी वाढली आहे प्रत्येकाने आपले कर्तव्य नीट बजावलं पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमावेळी विविध योजनांमधील लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री सामंत व एडके यांनी केले तर आभार कुडाळ वकील संघाचे अध्यक्ष राजश्री नाईक यांनी मानले.