कुडाळ भंगसाळ नदी पुलावर झालेल्या अपघातात स्कूटर वरील महिलेचे झाले निधन

0

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ येथील कार्यक्रमासाठी येणाऱ्या दांपत्याच्या स्कूटरला कारची धडक बसली आणि या झालेल्या अपघातामध्ये स्कूटर वरील वसुंधरा जनार्दन मांजरेकर हिचे उपचारादरम्यान निधन झाले. दरम्यान कार चालक वरून आनंद दामले (रा. डोंबिवली पूर्व) याच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात मुंबई गोवा महामार्गावरील भंगसाळ नदीच्या पुलावर झाला.

वेताळबांबर्डे ब्राह्मणवाडी येथील जनार्दन बापू मांजरेकर व त्यांची पत्नी वसुंधरा मांजरेकर हे दोघेही कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै विद्यालय येथे असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास येत होते. ते प्लेझर स्कूटर नंबर (एमएच-०७- एए- ६८३१) ही घेऊन येत होते. त्यांची स्कूटर भंगसाळ नदीच्या पुलावरून पुढच्या दिशेने कुडाळ शहर सर्विस रस्त्याच्या दिशेने येत असताना मुंबई ते गोवा या दिशेने जाणाऱ्या अल्टो कार क्रमांक (एमएच-०५- एफबी- ९७१३) या गाडीचे चालक वरून आनंद दामले यांनी स्कूटरला ठोकर दिली. या धडकेमध्ये जनार्दन मांजरेकर व वसुंधरा मांजरेकर हे दांपत्य रस्त्यावर पडले. त्यामध्ये दोघेही जखमी झाले. दरम्यान कारचालक वरून दामले यांनी आपल्या कारमध्ये बसवून त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र इथे उपचार होत नसल्यामुळे त्यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारसाठी पाठवण्यात आले हे उपचार सुरू असताना वसुंधरा मांजरेकर हिचे निधन झाले. या अपघाताबाबत तिचे पती जनार्दन मांजरेकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यानुसार कार चालक वरून दामले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.