कुडाळ नगराध्यक्ष पदासाठी दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल 

0

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप प्रणित सिद्धिविनायक नगर विकास आघाडीच्या नगरसेविका प्राजक्ता अशोक बांदेकर हिचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडी कडून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नगरसेविका सई काळप हिने अर्ज दाखल केला आहे दरम्यान नगराध्यक्ष पदाची निवडणूक २४ जानेवारी रोजी होणार आहे.

कुडाळ नगराध्यक्ष सौ अक्षता खटावकर यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणे होते यामध्ये भाजप प्रणित सिद्धिविनायक नगर विकास आघाडीच्या नगरसेविका प्राजक्ता बांदेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर महाविकास आघाडीच्या नगरसेविका सई काळप यांनी अर्ज दाखल केला. भाजप प्रणित आघाडीकडे ८ नगरसेवक आहेत तर महाविकास आघाडीकडे ९ नगरसेवक आहेत त्यामुळे २४ जानेवारी रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये काय करिष्मा होतो याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. 

भाजप प्रणित सिद्धिविनायक नगर विकास आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपा गटनेता विलास कुडाळकर नगरसेवक अभी गावडे, राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे तसेच विनायक राणे, ओंकार तेली, राकेश कांदे, आबा धडाम, चेतन पडते, चंदन कांबळी, रोहित भोगटे आदी उपस्थित होते तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार सई काळप यांच्यासोबत गटनेता मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर पिठासीन अधिकारी ऐश्वर्या काळुसे व मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी अर्जाची छाननी केली. यामध्ये दोन्ही अर्ज वैध ठरविण्यात आले.