सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे डोंगरमाथ्यावरून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येऊन तो गाळ नद्यांच्या पात्रात साचला जातो. वर्षानुवर्ष हा गाळ काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जात असल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभावतो. यावर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने पूराच्या तीव्रतेचा विचार करुन गाळ काढण्याच्या कामाचे प्राधान्यक्रम निश्चित करावे. प्राधान्यक्रम निश्चित झाल्यावर पहिल्या टप्प्यात गाळ काढण्यासाठी ५ ठिकाणांची यादी आणि करावयाच्या कार्यपध्दतीचा सविस्तर प्रस्ताव २४ जानेवारी पर्यंत तयार करुन सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदी,ओढे,नाले मधील गाळ काढण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, कुडाळ तालुक्यातील भंगसाळ, पीठढवळ, बेल नदी तर कणकवली तालुक्यातील गड नदी या नद्या गाळाने पूर्णपणे भरल्याने त्यांची वहन क्षमता कमी झालेली आहे. त्यामुळे या नद्यांच्या जवळ वसलेल्या लोकसंख्योला पुराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे या नद्यांमधील गाळ काढणे आवश्यक आहे. या नद्यांप्रमाणेच जिल्हा प्रशासनाने अन्य नद्यांचे सर्वेक्षण करुन कोणत्या नद्यांमध्ये गाळ साचलेला आहे त्याची माहिती घ्यावी तसेच हा गाळ काढण्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे त्याचे अंदाजपत्रक तयार करावे. गाळ काढण्यासाठी जिल्हा नियेाजन समितीच्या निधीमधून उपलब्ध करुन दिला जाणार आहे. गाळ काढण्याच्या ठिकाणांचा प्राधान्यक्रम निश्चित करुन पहिल्या टप्प्यात ५ ठिकाणांवर गाळ काढण्याचे काम सुरू करावे ते काम संपताच पुढील ५ ठिकाणांवरील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येईल असेही ते म्हणाले.
