कुडाळ | प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळ झाराप झिरो पॉईंट येथील ती टपरी आमदार निलेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने हटविली.
मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळ झाला येथे महामार्ग लगत असलेल्या हॉटेलमधील मालकासह त्याच्या कुटुंबीयांनी पर्यटकाला दोरीने बांधून मारहाण केली होती. या अमानुष मारहाणी बाबत समाजातून संतापाची लाट उसळली होती. दरम्यान याबाबत आमदार निलेश राणे सुद्धा आक्रमक झाले. त्यांनी झाराप झिरो पॉईंट येथील पर्यटकांना मारहाण केली गेलेली अनधिकृत टपरी येत्या २४ तासात काढा. अन्यथा १२ फेब्रुवारी रोजी हि टपरी मी स्वतः येऊन हटवणार असा इशारा आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाला दिला होता. कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार पोलिस यंत्रणा राहील असेही त्यांनी म्हटले होते.
आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाला इशारा दिल्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्यामधून ग्रामपंचायतीला पत्र पाठविण्यात आले. आणि त्या ठिकाणच्या ग्रामसेवकांनी तात्काळ संबंधित मालकाला नोटीस देऊन ही टपरी काढा असे सांगितले. दरम्यान कुडाळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी गेले टपरी मालकाला सांगितले. त्याने ही टपरी काढायला तात्काळ सुरुवात केली. ही अनधिकृत टपरी पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून तात्काळ काढण्यात आली.
