कुडाळ | प्रतिनिधी
झाराप येथे पर्यटकांना झालेल्या मारहाणीचे मुस्लिम समाज कोणत्याही प्रकारे समर्थन करीत नाही असे झाराप खान मोहल्ला येथील ग्रामस्थ रफिक शेख यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगून हॉटेल व्यवसायिक आणि पर्यटकांमध्ये झालेला वाद हा सामाजिक तेढ निर्माण करणारा नसावा या जिल्ह्यामध्ये सर्व धर्माचे लोक एकोप्याने राहतात तसेच वातावरण कायम राहिले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
झाराप येथे पर्यटकांना झालेल्या मारहाणीनंतर समाजातून संतप्त भावना व्यक्त होत असताना या घटनेच्या संदर्भात झाराप खान मोहल्ला येथील रहिवाशी रफिक शेख, मुनाफ खान, तबरेज आजगावकर, आसिफ मुजावर, वाहफ डिचोलकर, शामिद जद्दी यांनी कुडाळ येथील एमआयडीसी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेमध्ये रफिक शेख यांनी सांगितले की, झाराप खान मोहल्ला येथील ज्या मुस्लिम कुटुंबीयांनी पर्यटकांना मारहाण केले त्या घटनेचे मुस्लिम समाज समर्थन करीत नाही. त्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. पर्यटक व हॉटेल व्यवसायिकामध्ये झालेला हा वाद होता. मात्र या घटनेचे पडसाद सामाजिकतेवर उमटले या घटनेनंतर त्या कुटुंबीयांना समाजाच्यावतीने सुद्धा समजावण्यात आले. या प्रकरणात पोलीस प्रशासन असो किंवा ग्रामपंचायत प्रशासन असो या प्रशासनाच्या भूमिकेसोबत आम्ही राहिलो. कारण झालेली घटना ही चुकीची होती. पण त्याचा दोष समाजाला देऊन उपयोग नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्व धर्माचे माणसे एकोप्याने राहतात अशा घटनांमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये. यासाठी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमची भूमिका समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जरी हॉटेल व्यवसायिक मुस्लिम समाजाचा असला तरी त्यांनी केलेल्या कृत्याचे समर्थन आम्ही समाजबांधव करणार नाही. त्या घटनेच्या दृष्टीने पोलिसांनी कारवाई केलेली आहे. त्यामध्ये सुद्धा कोणताही हस्तक्षेप समाज म्हणून आम्ही केलेल्या नाही. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाशी संपर्क साधून ही भूमिका घेतलेली नाही. आमच्या समाजाची कुठेतरी प्रतिमा मल्लीन होऊ नये या दृष्टीने ही भूमिका घेतलेली आहे असे रफिक शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
