दुचाकी व आयशर टेम्पोच्या अपघातात नेरूर येथील युवकाचा मृत्यू

0

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ – वेंगुर्ले मार्गावर पिंगुळी रेल्वे ब्रीज नजिक बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दुचाकी व आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार हरेश संतोष नेरूरकर (वय 19, रा.नेरूर पंचशील नगर) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या समवेत मागे बसलेले प्रथमेश प्रकाश नेरूरकर (वय 27, रा.नेरूर पंचशीलनगर) व सुमित जाधव (वय 27, रा.नालासोपारा) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. दोघांचीही प्रकृती गंभीर असून, कुडाळ ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी एकाला गोवा बांबोळी येथे तर दुस-याला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हरेश हा मित्राची ज्युपीटर दुचाकी घेऊन, प्रथमेश व मित्र सुमित या दोघांना ट्रिपल सीट घेऊन पिंगुळीच्या दिशेने जात होता. प्रथमेश व सुमित हे दोघेही मुंबईला असतात. दोनच दिवसांपूर्वी ते गावी आले होते. पिंगुळी रेल्वेब्रीज पास केल्यावर हरेशचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि समोरून येणा-या आयशर टेम्पोला चालकाच्या बाजूने दुचाकीची धडक बसली. यात तिघेही रस्त्यावर पडले. यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना कुडाळ ग्रामीण रूग्णालयाच्या 108 क्रमांक रूग्णवाहीकेने उपचारासाठी तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हरेशचा तत्पूर्वीच मृत्यू झाला.

तर प्रथमेश व सुमीत या दोघांवर ग्रामीण रूग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्यांच्यावर येथील रूग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी तातडीने गोवा बांबोळी व ओरोस येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहीती माहीती मिळताच कुडाळ पोलिस ठाण्याचे अंमलदार दयानंद चव्हाण व एस.सी. वराडकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.